प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात भव्य ग्रंथ प्रदर्शन

अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई पालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या सहकार्याने बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहाच्या आवारात भव्य ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत दररोज सकाळी 9.30 ते रात्री 9.30 दरम्यान या प्रदर्शनाला भेट देता येणार आहे. प्रदर्शनात 200 प्रकाशकांच्या आणि दहा हजार लेखकांच्या जवळजवळ 50 हजार पुस्तकांची लक्षवेधी मांडणी या प्रदर्शनात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रदर्शनात पुस्तकांच्या खरेदीवर 15 टक्क्यांची विशेष सवलत देण्यात येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सुंदर सुलेखनातून साकारलेले पसायदान असलेला आकर्षक सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. या सेल्फी पॉइंटसह छायाचित्र घेऊन पालिकेच्या सोशल मीडिया हॅण्डलला ‘टॅग’ करणाऱया वाचकांना पाच टक्क्यांची अतिरिक्त सवलत मिळणार आहे.