पुणे बाजार समितीत बेशिस्त आडत्यांची रस्त्यात दुकानदारी, गाळे मोकळे अन् रस्त्यावर व्यापार; शेतकरी आणि खरेदीदार हैराण

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नियम फाट्यावर मारत काही बेशिस्त व मुजोर आडत्यांकडून रस्त्यात शेतमाल विक्री केली जात आहे. तर, गाळे रिकामे ठेवून रस्त्यांच्या मधोमधच शेतमालाची वाहने उभी करून थेट विक्री करत आहेत. त्यामुळे रविवारी मार्केटयार्ड परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. शेतकरी आणि खरेदीदार या दोघांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मात्र, बाजार समितीचे सचिव, विभाग प्रमुख आणि संचालक मंडळ याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे.

बाजार समितीने ठरवून दिलेल्या नियमानुसार शेतमाल गाळ्यावर उतरवूनच विक्री करणे बंधनकारक आहे. जास्त आवक झाल्यास गाळ्यासमोरील १५ फुट जागेत, पांढर्‍या पट्ट्यांनी दर्शविलेल्या सिमेतच विक्रीस परवानगी आहे. मात्र, माननीयांच्या जवळील काही आडत्यांनी या नियमांना फाट्यावर मारत मनमानी सुरू केली आहे. वाहन रस्त्याच्या मधोमध उभी करून, शेतमाल न उतरवता विक्री सुरू ठेवणे हा प्रकार आता नियमित झाला आहे. गाळ्यांच्या दोन पाकळ्यांमधील रस्त्यांच्या मधोमध आडत्यांनी वाहने उभी करून शेतमाल विक्री सुरू ठेवली होती. या बेशिस्त विक्रीमुळे संपूर्ण बाजार परिसरात वाहतूक ठप्प झाली होती. या बेशिस्तीमुळे केवळ कोंडीच नाही तर शेतमाल वेळेत विक्री न होणे, गुणवत्तेत घट येणे आणि व्यापार्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे. परिणामी, शेतकरी आणि खरेदीदार दोघेही हवालदिल झाले आहेत. गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी (दि. ५) केवळ ९० ट्रक शेतमालाची आवक झाली असतानाही बाजार परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला.

अर्थपुर्ण संबंधातून दुकानदारी

या सर्व प्रकारांकडे बाजार समिती प्रशासन, विभागप्रमुख आणि संबंधित कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. वाहनांमधून शेतमाल विक्री हे डमी आडत्यांच्या माध्यमातून अर्थपुर्ण संबंधातून प्रशासनाच्या आशीर्वादाने चालत असल्याची चर्चा पुर्वीपासून होती. आता या परिस्थितीमुळे त्यावर शिक्कामोर्तब होत असल्याचे स्पष्ट होत आहे. शिस्तभंग करणार्‍या या आडत्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास, बाजार परिसरातील कोंडी व अव्यवस्था आणखी वाढणार आहे, अशी शेतकरी व व्यापारी वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.