बिहारमध्ये SIR च्या नावाखाली फसवणूक, २३ लाख महिलांची नावे मतदार यादीतून वगळली; काँग्रेसचा आरोप

बिहारमधील ‘स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन’ (SIR) अर्थात विशेष मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र यावरूनच पुन्हा एकदा काँग्रेसने मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका केली आहे. “नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावरून निवडणूक आयोगाकडून बिहारमध्ये एसआयआरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे”, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या आहेत की, “बिहारमध्ये सुमारे ३.५ कोटी महिला मतदार आहेत, परंतु सुमारे २३ लाख महिलांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली.”

त्या म्हणाल्या की, “या महिला येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान करू शकणार नाहीत. हा निर्णय संविधानाच्या विरुद्ध आहे. बिहारमधील ज्या सहा जिल्ह्यांमध्ये लाखो महिलांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत त्यात, गोपाळगंज, सारण, बेगुसराय, समस्तीपूर, भोजपूर आणि पूर्णिया विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.”