
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्यूरो (NCRB) च्या ‘भारतीय तुरुंग सांख्यिकी २०२३’ अहवालानुसार, देशातील एकूण ६,९५६ परदेशी कैदी आहेत. यापैकी २,५०८ (३६ टक्के) कैदी बंगालच्या तुरुंगांमध्ये आहेत. या अहवालाने बंगालमधील तुरुंगांमधील परदेशी कैद्यांच्या वाढत्या संख्येवर प्रकाश टाकला असून, बहुसंख्य बांग्लादेशी नागरिकांवर अवैधरित्या हिंदुस्थानात प्रवेश केल्याचा आरोप आहे.
‘भारतीय तुरुंग सांख्यिकी २०२३’ अहवालानुसार, बंगालमध्ये ७७८ बांग्लादेशी दोषी कैदी आणि १,४४० विचाराधीन कैदी आहेत. बहुसंख्य कैदी १८ ते ३० वर्षांच्या वयोगटातील आहेत. या कैद्यांवर मुख्यतः अवैध स्थलांतराचे आरोप आहेत. यातच विचाराधीन कैद्यांच्या संख्येत वाढ होण्यामागे कायदेशीर मदतीचा अभाव, वकीलाची फी देण्याची आर्थिक अडचण, न्यायालयीन पीठांचा अभाव आणि खालच्या न्यायालयांवरील ताण यांचा समावेश आहे.
बंगालमधील विदेशी कैद्यांची संख्या देशातील एकूण परदेशी कैद्यांच्या ३६ टक्के आहे, जी सर्वाधिक आहे. इतर राज्यांच्या तुलनेत बंगालची तुरुंगे अतिव्यस्त आहेत, ज्यामुळे प्रशासकीय आव्हाने वाढली आहेत.