दिल्ली डायरी – केरळमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच

>> नीलेश कुलकर्णी  [email protected]

केरळच्या समुद्रकिनारी ‘कमळ’ फुलविण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार असे लक्षात आल्याने भाजपने केरळची विधानसभा निवडणूक गांभीर्याने न घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेस व डावे अशा दोन आघाडय़ांत होणार हे निश्चित झाले आहे. केरळमध्ये कोणाची सत्ता येते हे ठरायला अवकाश असला तरी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी आजच अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. काँग्रेस श्रेष्ठाRना या मंडळींना आधी आवर घालावा लागेल.

केरळात आपण जिंकू शकत नसलो तरी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवू शकतो या भूमिकेतून भाजपवाले डाव्यांना रसद पुरविण्याच्या तयारीत आहेत. डावे व उजवे असे दोन टोकाचे राजकीय ध्रुव अशा पद्धतीने पडद्याआडून एकत्र येताना दिसत आहेत. केरळमधील पक्ष संघटना मोडकळीस आल्याचे लक्षात आल्यानंतर काँग्रेस नेत्या खासदार प्रियंका गांधी केरळात सक्रिय झाल्या आहेत. सुरुवातीला त्यांनी आपल्या वायनाड या मतदारसंघातील गटबाजी मोडीत काढत कामाला सुरुवात केली आहे. अशाच पद्धतीचे काम त्यांना व राहुल गांधी यांना संपूर्ण केरळमध्ये करावे लागणार आहे. तरच काँग्रेसचा दहा वर्षांचा ‘सत्तेचा दुष्काळ’ दूर होऊ शकेल. काँग्रेस पक्षांतर्गत लाथाळ्या व इतर कारणांमुळे काँग्रेसने या वेळी सत्तेची संधी गमावली तर भविष्यात काँग्रेसला पुन्हा सत्तेत परतणे अशक्यप्राय होऊन बसेल. त्यासाठी पक्षातील मुख्यमंत्रीपदासाठीची ‘गुडगे बाशिंग स्पर्धा’ काँग्रेस हायकमांडला नियंत्रणात आणावी लागेल.

केरळमधले एक विद्वान खासदार शशी थरूर यांना काँग्रेस हायकमांडने सध्या सुरक्षित अंतरावर ठेवल्यामुळे केरळ काँग्रेसमधल्या इतर नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पक्षाचा विरोध असतानाही थरूर हे पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळात नुसते सामील झाले नाहीत, तर त्यांनी मोदी सरकारच्या फसलेल्या विदेशनीतीची भलामण सगळ्या जगात केली. त्यामुळे साहजिकच थरूर काँग्रेस नेतृत्वाच्या मनातून उतरले. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील एक मोहरा गळाला हा इतर काँग्रेसजनांना त्यामुळे वाटणारा आनंद. अर्थात काँग्रेसमध्ये सध्या के. सी. वेणुगोपाल विरुद्ध इतर असा मुकाबला पाहायला मिळत आहे. एकेकाळी सोनिया गांधी काँग्रेसचे मुख्य सत्तापेंद्र असताना ए. के. अंटोनी यांना जे काँग्रेसमध्ये स्थान होते तेच स्थान आता वेणुगोपाल यांनी राहुल गांधींच्या कार्यकाळात प्राप्त केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेले इतर काँग्रेसजन नाराज आहेत. केरळमध्ये काँग्रेस जिंकलीच तर वेणुगोपालच मुख्यमंत्री होतील किंवा ज्याप्रमाणे अंटोनी यांनी वायलर रवी यांच्याऐवजी ओमान चांडी यांना मुख्यमंत्री बनवले होते, त्याप्रमाणे आपल्या मर्जीतील नेत्याची मुख्यमंत्रीपदी वर्णी लावतील, असा कयास लावला जात आहे. सर्वात ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला, सतीशन यांनीही मुख्यमंत्रीपदासाठी दावा ठोकला आहे. चेन्निथला यांनी नुकतीच राज्यातील ड्रग्जविरोधी यात्रा काढली आहे. या यात्रेत प्रियंका गांधींनी सहभागी व्हावे यासाठी चेन्निथला यांनी खूप प्रयत्न केले. मात्र त्या सामील झाल्या नाहीत. ही यात्रा प्रियंकांच्या वायनाड मतदारसंघात आल्यानंतर सोनिया गांधी व प्रियंका यांची चेन्निथला यांच्याशी ‘योगायोगा’ने झालेल्या भेटीमुळेही राजकारण रंगले आहे.

देवीलाल यांचा विसर

देशाचे माजी उपपंतप्रधान व समाजवादी चळवळीतले बडे नेते चौधरी देवीलाल यांच्या जयंतीचा विसर यंदा समाजवादी मंडळींना पडला. दरवर्षी देवीलाल यांच्या जयंतीनिमित्त हरयाणात मोठी सभा आयोजित केली जाते. त्यात समाजवादी विचारधारेसह इतर पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रण दिले जाते. एक माहौल तयार केला जातो. यंदा मात्र या पातळीवर सगळी सामसूमच दिसून आली. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हा समारोह आयोजित करण्यासाठी पुढाकार घेणारे संयुक्त जनता दलाचे नेते के. सी. त्यागी हे बिहारच्या निवडणुकीत बिझी आहेत. त्यागींसह नितीशबाबूही आपले सरकार पुन्हा येईल यादृष्टीने कामाला लागले आहेत. मुलायमसिंग, शरद यादव, रामविलास पासवान ही दिग्गज समाजवादी मंडळी हयात नाहीत. प्रकाशसिंग बादलही नाहीत. लालू यादव हे बिहार निवडणुका, कुटुंबातील कलहाबरोबरच तब्येतीच्या तक्रारीने त्रस्त आहेत. त्यामुळे महत्त्वाचे नेते या कार्यक्रमाला नव्हते. देवीलाल यांचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे निधन झाल्यामुळे 25 सप्टेंबरचा दिवस सुनासुनाच गेला. समाजवादी चळवळीतील पुढच्या पिढीच्या नेत्यांचे परस्परांशी तितके सौहार्दपूर्ण संबंध नाहीत, असा मेसेज यानिमित्ताने गेलाच नाही म्हणायला औपचारिकता म्हणून आयोजकांनी एक रॅली घेतली खरी, मात्र त्याची कोणी दखलही घेतली नाही

डी. राजांची हॅटट्रिक

75 वर्षे ही काही राजकारणातून रिटायरमेंट घ्यायची सीमा नाही याचा साक्षात्कार डाव्या पक्षांनाही झाला असावा. त्यामुळेच मोदींपासून प्रेरणा घेत की काय, भारतीय कम्युनिस्ट पार्टीने आपल्या सरचिटणीसपदी सलग तिसऱ्यांदा डी. राजा यांची निवड केली आहे. राजांनी नुकतीच पंचाहत्तरी पूर्ण केलेली आहे. डाव्यांकडे सगळेच विद्वान असल्याने ‘मार्गदर्शक मंडळ’ वगैरे नसले तरी राजा घरी बसून विश्रांती घेत जगभरातील साम्यवाद का व कसा संपुष्टात आला? यावर अभ्यास करतील असे वाटत असतानाच त्यांच्या पक्षाने त्यांना तिसऱ्यांदा सरचिटणीसपदी संधी दिली. डाव्या-उजव्यांचे हे मेतकूट असे कधी कधी जमते. दिल्लीत झालेल्या माकपाच्या काँग्रेसमध्ये राजांच्या सरचिटणीसपदाची हॅट्ट्रिक झाली. यापूर्वी मदुराईमध्ये झालेल्या काँग्रेसमध्ये पुढच्या वेळी राजा हे 75 वर्षांचे होतील, त्यामुळे त्यांना संधी दिली जाणार नाही. दुसरा चेहरा सरचिटणीसपदासाठी निवडला जाईल, असा ठराव पारित केला गेला होता. त्याचे ‘वैचारिक शीर्षासन’ डाव्यांनी करून दाखविले. डाव्यांकडे राजा यांच्या उंचीचा नेता नसणे, हे त्यामागचे प्रमुख कारण सांगितले जाते. उपेक्षित समाजातले असणे हे दुसरे कारण. त्याचबरोबर डाव्यांमध्ये पुढच्या पिढीचे नेतेच नसल्याने ही आफत ओढवल्याचेही बोलले जात आहे. कन्हैया कुमारला डाव्यांनी कसेबसे पक्षकार्याला जुंपले होते. मात्र कन्हैयाने काँग्रेसचा हात हाती घेतल्यानंतर डाव्यांकडे चेहरा नाही. त्यामुळे ‘राजा की बल्ले बल्ले’ झाल्याचे मानले जात आहे.