
देशभरातील बँकांमध्ये 1.84 लाख कोटी रुपये पडून आहेत. या रकमेवर कुणी दावा केलेला नाही. हे पैसे मूळ दावेदारांना किंवा त्यांच्या वारसांना, कुटुंबाला परत केले जातील. यासाठी विशेष मोहिमेंतर्गत प्रत्येक जिह्यात शिबिरे राबवून लोकांना त्यांची रक्कम मिळवण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
बँका, आरबीआय आणि इतर नियामकांकडे 1.84 लाख कोटी रुपयांचे दावेदार नसलेली आर्थिक संसाधने पडून आहेत. ‘आपली पूंजी, आपले अधिकार’ या तीन महिन्यांच्या देशव्यापी मोहिमेद्वारे हे धन खऱया मालकांकडे परत दिले जाणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. 4 ऑक्टोबरला गांधीनगर येथे ‘आपली पूंजी, आपले अधिकार’ या मोहिमेचा शुभारंभ झाला.
बेवारस धनाचे प्रमाण किती
डीएफएस (वित्तीय सेवा विभाग) नुसार, बँका, आरबीआय आणि आयईपीएफ (निवेशक शिक्षण आणि संरक्षण निधी) यांच्याकडे 1.84 लाख कोटींचे दावेदार नसलेले धन जमा आहे. ऑगस्ट 2025 पर्यंत 75 हजार कोटी रुपये आरबीआयच्या डिपॉझिटर एज्युकेशन फंडमध्ये हस्तांतरित झाले आहेत. ही रक्कम पूर्णपणे सुरक्षित आहे आणि सरकार त्याची संरक्षक आहे. दावेदारांना योग्य पुरावे सादर केल्यास ताबडतोब हस्तांतरण होईल, ज्यामुळे नागरिकांना आर्थिक स्थैर्य मिळेल, असे सीतारमण यांनी स्पष्ट केले.
डिजिटल पद्धतीनेही दावा कसा कराल?
- दाव्यांची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारने डिजिटल पोर्टल्सचा वापर सुरू केला आहे.
- UDGAM पोर्टल ः रिझर्व्ह बँकेचे UDGAM (अनक्लेम्ड डिपॉझिट गेटवे टू अॅक्सेस इन्फॉर्मेशन) पोर्टल नागरिकांना दावा न केलेली रक्कम शोधण्यास मदत करते.
- दावा प्रक्रिया ः नागरिकांनी योग्य ती कागदपत्रे घेऊन जवळच्या बँका किंवा संबंधित संस्थांकडे जावे. वित्तमंत्र्यांनी सल्ला दिला आहे की, तुम्ही एकदा दावा दाखल करताच तुम्हाला तुमचा पैसा मिळतो.
- तुम्हीही आरबीआयच्या UDGAM पोर्टलवर जाऊन तुमच्या कुटुंबातील किंवा तुमच्या नावाने दावा न केलेली कोणतीही रक्कम आहे का, हे तपासा.