
>> विनायक
यंदाचा पाऊस संपत आलाय. म्हणजे आता ‘उघड पावसा ऊन पडू दे’ म्हणण्याची वेळ आली आहे. या वर्षी भरपूर, काही ठिकाणी तर अतिवृष्टी व ढगफुटी होऊन ओल्या दुष्काळाची वेळ आली. हाताशी आलेली पिकं सुखरूप राहणं हे शेतकऱ्याच्याच नव्हे तर एकूणच सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं. बदलत्या हवामानाच्या दुर्लक्षित विषयाने, परंतु लक्षणीय तडाख्याने आज सारं जगच हैराण होताना दिसतंय.
पावसाचं प्रमाण पृथ्वीवर सर्वाधिक असतं ते विषुववृत्तीय भागात आणि विषुववृत्तापासून दोन्ही बाजूला साडेतेवीस अक्षांशापर्यंतच्या उष्ण समशीतोष्ण कटिबंधात इथली जंगलं दाट व वनस्पती-वैविध्याने नटलेली असतात. आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीपासूनचा सह्याद्री, दक्षिणेकडे जाताना नीलगिरी झालेल्या पर्वतमालेत, केरळपर्यंत अनेक दुर्मिळ वनस्पतींचं वसतिस्थान आहे. पश्चिम घाटातील जागतिक महत्त्वाच्या या जैविक वारश्याची जपणूक आपल्याला करायलाच हवी.
वन-काननांचे अनेक प्रकार असतात. उष्ण, समशीतोष्ण शीत आणि वाळवंटातही वाढणारी झाडं-झुडपं त्या त्या प्रदेशातील नैसर्गिक हवापाण्याशी नातं सांगतात. तसंच ‘पर्जन्यवन’ पिंवा ‘रेन फॉरेस्ट’ हे पुष्कळ पावसाशी नातं सांगतात. तामीळनाडू, केरळसारख्या राज्यांमध्ये जवळ जवळ वर्षभर रिमझिम पाऊस पडत असतो. त्यामुळे हे छोटसं राज्य कायम हिरवंगार दिसतं. याच राज्यात ‘मुन्ननतेराई’ इथे एक पर्जन्यवन आहे.
पर्जन्यवन म्हणजे जिथे वर्षभर झाडांची छत्रछाया आणि दमट वातावरणातील वेली, रोपं वाढतात तो प्रदेश. या वनांचं वैशिष्टय़ म्हणजे इथे एका मोठय़ा वृक्षावर इतर अनेक छोटी झाडं उगवतात. त्यांना ‘एपिफिटेस’ म्हणतात. ही बांडगुळं (पॅरासाइटस) नसतात. मॉस, ब्रोमेलियॅड, एअर प्लॅन्टस, ऑर्चिड असे त्यांचे प्रकार. ती मोठय़ा झाडांच्या खोडातील जीवनरसाचा भाग बनतात. लियानास म्हणजे जमिनीत घट्ट मुळं रुजलेल्या, परंतु मोठय़ा झाडांना लपेटून वाढणाऱ्या लांब, जाड वेली. इतर फुलवेलींसारख्या त्या नाजूक नसतात. सूर्यप्रकाशाच्या ओढीने या वेली उंचच उंच वाढतात.
पर्जन्यवनात कमालीची जैवविविधता आढळते. पृथ्वीवरचे सुमारे 40 ते 75 टक्के जीव म्हणजे वनस्पती, कीटक, प्राणी, सूक्ष्मजीवांचं निर्मिती आणि वसतिस्थान पर्जन्यवन असतं. यावरून त्याचं जैविक साखळीतलं महत्त्व किती अगाध आहे हे लक्षात यावं. ‘रेनफॉरेस्ट’मध्ये इतपं जैववैविध्य असण्याचं मुख्य कारण म्हणजे तिथे असणारा सततचा दमटपणा आणि आवश्यक तेवढा उबदारपणा वनस्पतींसह सर्वच सजीवांच्या वाढीला पोषक ठरतो. या वातावरणामुळे येथील जैवविविधतेला आत्मवृद्धीसाठी जास्त कष्ट करावे लागत नाहीत.
पर्जन्यवनातलं हवामान वर्षभर स्थिर असल्याने इथल्या वेली, वनस्पती आणि सूक्ष्म ते मोठय़ा प्राण्यांपर्यंतच्या सर्व सजीवांमध्ये एक प्रकारचं परस्परावलंबित्व तयार होऊन ते ‘जगा आणि जगू द्या’ तत्त्वावर राहत असतात. अशा वनांची आणखी एक विशेषतः म्हणजे या वनाच्या मुळांपासून ते माथ्यापर्यंत एकाच प्रकारचं वातावरण नसतं. या ‘व्हर्टिकल’ किंवा ‘आरोही’ थराच्या नैसर्गिक व्यवस्थेमध्ये (व्हर्टिकल स्टॅटिफिकेशन) वेगवेगळय़ा सजीवांना अनुकूल असं वेगवेगळं वातावरण असतं.
अॅमेझॉनच्या पर्जन्यवनातील उदाहरण घ्यायचं तर तिथल्या एक चौरस किलोमीटर वनात सुमारे 75 हजार प्रकारची झाडं आणि दीड लाख प्रकारचे सजीव मुळापासून शेंडय़ापर्यंत थरांमध्ये सामावलेले असतात. याच जंगलात 2 हजार प्रकारचे पक्षी आणि तेवढेच जलचरही आढळतात. पर्जन्यवनात 25 लाख प्रकारच्या कीटकांच्या प्रजातींची वाढ होते. तळाशी वाढणाऱ्या अनेक कीटकांप्रमाणेच वरच्या ‘कॅनपी’ किंवा वनाच्या ‘छता’मध्ये राहणाऱ्या माकडांसारख्या प्राण्यांचा परस्पर संबंध येत नाही. वरच्या थरात राहणारे प्राणी तिथेच आपलं आयुष्य घालवतात.
हिंदुस्थानातील दक्षिण आणि ईशान्येकडच्या पर्जन्यवनांची गणना जगातल्या 36 जैववैविध्याने बहरलेल्या वनांमध्ये होते. या वनांमध्ये पृथ्वीवरून नष्ट होण्याच्या धोक्यापर्यंत पोहोचलेल्या 300 प्रजातींचा समावेश होतो. तोसुद्धा पश्चिम घाटाच्या वनांमध्ये अधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्रापासून केरळपर्यंतच्या पश्चिमी राज्यांवर या वनाचं रक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी येते. अर्थात सर्वसामान्य लोकांनाही त्याचे ज्ञान देऊन आदिवासींप्रमाणे त्यांनी निसर्ग-वनस्नेही होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोणत्याही कारणाने अशा वनांवर आक्रमण करून, त्यांचा ऱहास करून निसर्गचक्र क्षणात बिघडविण्याचा नैतिक अधिकार कोणालाच नाही. माणूस या पृथ्वीचा मालक नाही.
एकसारखी झाडे मोठय़ा प्रमाणात असलेल्या वृक्षारोपणाने केवळ सावली मिळू शकेल, पण लाखोंनी जैववैविध्य असलेलं ‘वन’ असं कृत्रिम ‘वनीकरणा’तून तयार होत नसतं. त्याला लाखो वर्षांचा काळ लागतो हे माणसांच्या कधी लक्षात येईल का?