
कल्याण-तळोजा मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान आज सायंकाळी मोठी दुर्घटना टळ्याची घटना घडली. कल्याण-शिळ महामार्गावरील डीएनएस बँकेजवळ मेट्रोसाठी उभारला जाणारा लोखंडी पिलर अचानक झुकल्याने परिसरात काही काळ प्रचंड घबराट पसरली.
मेट्रोच्या पिलर उभारणीचे काम सध्या कल्याण-शिळ मार्गावर जोरात सुरू आहे. आज सकाळपासून कंत्राटदार कंपनीचे कामगार पिलर क्रमांक 145 वर काम करत होते. हा पिलर अर्धवट कॉंक्रीटने तयार झाला असून, उर्वरित भागासाठी त्यावर लोखंडी कमान उभारण्याचे काम सुरू होते. दरम्यान, ही कमान एका बाजूला झुकू लागल्याचे लक्षात आल्यानंतर कामगारांनी तात्काळ आरडाओरडा करून इतरांना सावध केले.घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने काम थांबवण्यात आले. पिलरवर असलेल्या कामगारांना तीन क्रेनच्या मदतीने सुरक्षित खाली उतरवण्यात आले. यानंतर झुकलेल्या पिलरला क्रेनचा आधार देण्यात आला असून, संपूर्ण पिलर व संरचनेची तपासणी अभियंते व तज्ञांच्या पथकाकडून करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत दोन्ही बाजूची वाहतूक रोखली. त्यामुळे आधीच गर्दीने ग्रासलेल्या कल्याण-शिळ महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. काही वेळानंतर टेकू दिल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली असली तरी दीर्घकाळपर्यंत वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.
सखोल चौकशी सुरू
पिलर झुकण्यामागचे नेमके कारण समजण्यासाठी मेट्रो प्रशासन आणि कंत्राटदार कंपनीने सखोल चौकशी सुरू केली आहे.


























































