मतदान केंद्रांचे 100 टक्के वेबकास्टिंग, बिहारनंतर देशभरात एसआयआर

‘मतदान केंद्रावरील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवता यावे म्हणून यापुढे मतदानाचे शंभर टक्के लाइव्ह व्हिडीओ रेकार्ंडग (वेबकास्टिंग) केले जाणार आहे. बिहारपासून याची सुरुवात होईल,’ अशी महत्त्वाची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी आज केली. बिहारमध्ये मतदार फेरछाननी प्रक्रिया (एसआयआर) यशस्वी ठरली असून आता देशभरात ती राबवण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन देशातील मतदार याद्यांतील गोंधळाचा पर्दाफाश केला होता. त्याचे पुरावेही त्यांनी देशासमोर मांडले होते. निवडणूक आयोग सत्ताधारी भाजपशी मिळून हे सगळे करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. राहुल यांचे आरोप फेटाळणाऱ्या आयोगाने नंतर निवडणूक प्रक्रियेत अनेक सुधारणा केल्या. आज ज्ञानेशकुमार यांनी नव्या सुधारणांची यादीच सादर केली.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या पाटणा दौऱयावर असलेले ज्ञानेशकुमार यांनी येथील तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नव्या बदलांची माहिती दिली. ‘आतापर्यंत केवळ 50 ते 60 टक्के मतदान केंद्रांवर मतदान केंद्राच्या आत वेबकास्टिंग (लाइव्ह व्हिडीओ रेकार्ंडग) व्हायचे. मात्र यापुढे देशभरातील प्रत्येक मतदान केंद्रावर 100 टक्के वेबकास्टिंग लागू केले जाईल, असे ज्ञानेशकुमार म्हणाले.

निवडणूक आयोगाचे नवे उपक्रम

  • ईव्हीएम मतमोजणीच्या शेवटच्या दोन फेऱयांच्या आधी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण करणे अनिवार्य असेल.
  • बुथ स्तरीय अधिकाऱयांचे (बीएलओ) आणि बीएलओ पर्यवेक्षकांचे मानधन दुप्पट होणार. देखरेख कर्मचारी, सीएपीएफ, मतदान आणि मतमोजणी कर्मचाऱयांनाही वाढीव मानधन मिळणार. ईआरओ आणि एईआरओना मानधन किंवा कामाची निश्चित वेळ करणार. अल्पोपाहार खर्चासाठी वाढीव तरतूद.
  • बुथ स्तरीय अधिकाऱयांनाही (बीएलओ) ओळखपत्रे दिली जाणार
  • गोंधळ टाळण्यासाठी मतदारांना लाल रंगात चिन्हांकित केलेली स्पष्ट मतदार माहिती स्लिप (VIS) दिली जाणार नाही.
  • निवडणूक आयोगाचे विविध 40 अॅप आता ईसीआयनेट (ECINET) नावाच्या एकाच प्लॅटफॉर्मवर पाहता येतील. या अॅप्सवर रिअल टाइम मतदान डेटादेखील अपडेट केला जाईल.
  • मतदानानंतर मतदारांची आकडेवारी मिळावी यासाठी निवडणूक आयोग डिजिटल इंडेक्स कार्ड तयार करत आहे. हे कार्ड निवडणुकीनंतर काही दिवसांत उपलब्ध करून दिले जातील.

एका मतदान केंद्रावर फक्त 1200 मतदार

एकाच मतदान केंद्रावर मतदारांची संख्या 1500 पेक्षा जास्त झाल्यास तिथे लांबच लांब रांगा लागत असल्याचे दिसते. गोंधळाची स्थिती निर्माण होते. यावर उपाय म्हणून यापुढे एका मतदान केंद्रावर 1200 पेक्षा जास्त मतदार नसतील अशी व्यवस्था केली जाईल, असे ज्ञानेशकुमार यांनी सांगितले.

राहुल गांधींच्या दणक्यानंतर सुधारणा…

  • मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या अंतरावर उमेदवारांना त्यांचे बुथ उभारता येतील.
  • मतपत्रिकांवरील अनुक्रमांकाचा फॉन्ट मोठा असेल. उमेदवारांचे रंगीत फोटो ईव्हीएमवर दिसतील.
  • ईव्हीएम मतमोजणी युनिटमध्ये विसंगती आढळली तर व्हीव्हीपॅटची फेरमोजणी केली जाईल.
  • मतदारांचे मोबाईल ठेवण्यासाठी मतदान केंद्राबाहेर व्यवस्था केली जाईल.
  • मतदार यादीत सुधारणा झाल्यानंतर 15 दिवसांनी नवीन EPIC कार्ड वितरित केले जाईल