शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 23 लाखांची फसवणूक

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली एकाची 23 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे माटुंगा येथे राहतात. जुलै महिन्यात त्यांनी फेसबुकवर जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीवर क्लिक केल्यावर एक त्यांना मेसेज आला. मेसेज पाठवणाऱ्याने त्याचे नाव सांगितले. त्याने तो एका प्रसिद्ध शेअर ट्रेडिंग कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवले. त्यानंतर त्याने तक्रारदार यांना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. ठगाने त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर एक लिंक पाठवली. ती लिंक उघडली असता एक अ‍ॅप डाऊनलोड झाले. ठगाने सुरुवातीला त्यांना 10 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितली.

गुंतवणूक केल्यास त्यांना केलेल्या गुंतवणुकीवर चारशे रुपये नफा झाल्याचे दिसले. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. त्यांनी 20 लाख रुपयांची गुंतवणूक केली. पाच दिवसांनी त्यांना पुन्हा एक नवीन जाहिरात दिसली. ठगाने त्यांना मेसेज करून गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली. पैसे गुंतवणूक केल्यानंतर दोन महिन्यांनी त्यांना एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून का काढले, याबाबत विचारणा केली असता ठगाने त्यांना बोलबच्चन देण्यास सुरुवात केली. तक्रारदार यांनी केलेल्या गुंतवणुकीमधून 5 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला.