
- संजय कऱ्हाडे
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील तीन वन डे सामन्यांसाठी रोहित आणि कोहलीची संघात निवड झाली. चर्चा रंगल्या. 2027 साली होणाऱया विश्वचषक स्पर्धेपर्यंत टुणटुणल्या… कसोटी अन् टी-ट्वेंटीमधून आधीच निवृत्त झालेले हे दोन्ही दिग्गज तोपर्यंत वयाची साधारण चाळिशी गाठतील. तेव्हापर्यंत फिटनेस आणि उत्साह कायम राहणार असं त्यांना वाटत असतं तर ते कसोटी आणि टी-ट्वेंटीमधून निवृत्तच झाले नसते.
गौतम गंभीरच्या हाती मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रं गेली तेव्हापासूनच रो-कोच्या भविष्याची सगळय़ांनाच चिंता वाटायला सुरुवात झाली होती. त्यात काहीसं तथ्य होतं. कोहली आणि गंभीर मैदानाबाहेरचं ठाऊक नाही, पण प्रत्यक्ष मैदानावर हमरीतुमरीवर आलेले होतेच. त्यांच्यातला संवाद डांबर-पाण्यासारखाच भासायचा. गंभीरने याचा इन्कार केलाय आणि विराटनेही विषय टाळलाय. खरं तर कसोटी क्रिकेट कोहलीसाठी रामाच्या हृदयातल्या हनुमानासारखं. मात्र त्याने दहा हजारांचा टप्पा गाठायला जेमतेम सातशे धावा कमी ठेवून निवृत्त व्हावं याला काय म्हणायचं!
रोहितच्या मनाचा थांग स्पष्ट दिसला नाही, पण तोसुद्धा कधी गौतमला घट्ट मिठी मारताना किंवा कडकडीत टाळी देता-घेताना दिसला नाही. त्याला तर सगळे जिवाभावाचा मानतात आणि असं म्हणणाऱयांत अनेक दादा लोक आहेत.
बरं, आज वर्षभरात किती वन डे सामने खेळले जातात. फारतर एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे! विश्वचषकापर्यंत म्हणजे आणखी दोन वर्षे त्यात बदल होण्याची शक्यता नाहीच. मग फक्त तेवढेच सामने खेळण्यासाठी या दादा फलंदाजांना काय किंवा कोण प्रवृत्त करू शकेल. ते स्वतःच! पण कारकीर्दीच्या या टप्प्यावर पुन्हा खेळण्याचं प्रयोजन काय? कुठली स्फूर्ती, कुठली प्रेरणा?
गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रो-कोची कामगिरी त्यांच्या लौकिकास साजेशी नव्हती. आता पुन्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्याची संधी आहे. एवढी साधावी. साध्य झाल्यास चमकदार कामगिरीच्या उंचावरून, अन्यथा किमान तसा प्रयत्न केल्याचं समाधान मनात घेऊन आपापल्या बॅटी पूर्णपणे म्यान कराव्यात असा त्यांनी विचार केला असणार असं मला वाटतं.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरचे तिन्ही सामने ते खेळतील, किंबहुना त्यांचा तसाच संवाद निवड समिती सदस्यांबरोबर झाला असावा असाही माझा कयास आहे. रोहित-विराट, बिनासंकोच खेळा. तुम्हा दोघांसाठी फार काही सिद्ध करण्यासारखं बाकी नाही. आमच्यासाठी तुम्ही आमचे हीरो आहात, नेहमीच रहाल!