हिंदुस्थान ‘अ’चा मालिका विजय, ऑस्ट्रेलिया ‘अ’ला निर्णायक सामन्यात हरविले

हिंदुस्थान ‘अ’ संघाने निर्णायक तिसऱया अनधिकृत वन डे क्रिकेट सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा पराभव करून मालिका विजय साजरा केला. हिंदुस्थानने तीन सामन्यांची ही मालिका 2-1 फरकाने खिशात घातली. शतकवीर प्रभसिमरन सिंग या निर्णायक सामन्यात ‘सामनावीर’ ठरला, तर ‘मालिकावीरा’ची माळ रियान परागच्या गळ्यात पडली. ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाकडून मिळालेले 317 धावांचे लक्ष्य हिंदुस्थान ‘अ’ संघाने 46 षटकांत 8 बाद 322 धावा करून पूर्ण केले. लक्ष्याचा पाठलाग करताना टी-20 फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी करणारा ‘टीम इंडिया’चा अभिषेक शर्मा ‘इंडिया अ’ संघाकडून खेळताना ‘ऑस्ट्रेलिया अ’ यांच्यातील तिसऱया अनधिकृत वन डे क्रिकेट सामन्यात पुन्हा अपयशी ठरला. अभिषेक फक्त 25 चेंडूंमध्ये 22 धावा करून माघारी परतला. पहिल्या वन डेत तो गोल्डन डकवर बाद झाला होता, मात्र, त्याचा सलामीचा सहकारी प्रभसिमरन सिंग याने या सामन्यात कांगारूंच्या गोलंदाजांचा समाचार घेत वादळी शतक झळकावले.

ऑस्ट्रेलिया चा डाव 316 धावांवर संपला

ऑस्ट्रेलिया ‘अ’चा कर्णधार जॅक एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र कांगारूंनी  49.1 षटकांत 316 धावसंख्या उभारली.  एडवर्ड्सने सर्वाधिक 89 धावा, तर लियाम स्कॉटने 73 आणि कूपर कोनॉलीने 64 धावा केल्या. हिंदुस्थान ‘अ’कडून अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले.

 प्रभसिमरन सिंगचा शतकी धमाका

ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाच्या 49.1 षटकांत 316 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना  अभिषेक शर्मा व तिलक वर्मा (3 धावा) अपयशी ठरल्यानंतर प्रभसिमरन सिंगने ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध दुसर्या वन डेत केवळ 66 चेंडूंमध्ये शतक झळकावले. अखेरीस तो 102 धावा करून तन्वीर संघा याच्या गोलंदाजीवर बाद झाला. प्रभसिमरनने या खेळीत 150च्या स्ट्राइक रेटने 8 चौकार आणि 7 षटकार ठोकले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर (62) व रियान पराग (62) यांनी 117 धावांची भागीदारी करीत हिंदुस्थानच्या आशा पल्लवीत केल्या. अय्यरने 58 चेंडूंत 7 चौकारांसह एक षटकार लगावला, तर परागने 55 चेंडूंत 5 चौकारांसह 3 षटकार ठोकले.  हे दोघे बाद झाल्यानंतर आयुष बदोनी (21), विपराज निगम (नाबाद 24) व अर्शदीप सिंग (नाबाद 7) यांनी हिंदुस्थानला विजयापर्यंत पोहोचविले. ऑस्ट्रेलियाकडून तन्वीर संघा व टॉड मर्फी यांनी 4-4 फलंदाज बाद केले.