ग्रामपंचायत कार्यालयात लिपिकावर भाजप उपसरपंचाचा हल्ला, व्हिडीओ व्हायरल

सरावली ग्रामपंचायतीत लिपिक पदावर कार्यरत संकेत संतोष सावंत यांना भाजपचा उपसरपंच आणि त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून गावात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लिपिक संकेत सावंत हे सोमवारी (दि. ६ ऑक्टोबर २०२५) रोजी आपल्या नियमित कर्तव्यावर ग्रामपंचायतीत येत असताना एका बाहेरील व्यक्तीसमवेत आलेल्या उपसरपंचांनी त्यांच्यावर हल्ला करून मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर संकेत सावंत यांनी सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना लेखी तक्रार दिली असून संबंधित घटनेची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणात लिपिक सावंत यांनी उपसरपंच शुभम वडे यांच्यावर गंभीर आरोप करत, भाजपच्या सत्तेचा माज आला असून, पदाचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांना धमकावले जात आहे, असा आरोप केला आहे.

दरम्यान, या घटनेबाबत बोईसर पोलिस ठाण्यात अद्याप गुन्हा नोंद झाला नसून, पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू असल्याचे समजते. व्हायरल व्हिडिओच्या आधारे पुढील कारवाई होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या प्रकारामुळे ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)