प्रमोद भगतला ट्रिपल सुवर्ण, अबिया पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत हिंदुस्थान सुस्साट

हिंदुस्थानचा स्टार पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने आपल्या सोनेरी यशाचा धमाका कायम ठेवत अबिया पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकून इतिहास रचला. 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरदरम्यान नायजेरियात झालेल्या या स्पर्धेत 37 वर्षीय भगतने पुरुष एकेरी (एसएल3), पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी या तीन प्रकारांमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱया, पण पॅरिस स्पर्धेला ‘व्हेअरअबाउट्स’ नियमभंगामुळे मुकलेल्या प्रमोद भगतने पुनरागमनानंतर जबरदस्त कामगिरी केली. पुरुष एकेरी एसएल-3 प्रकारात त्याने हिंदुस्थानच्याच मंतू कुमारवर 21-7, 9-21, 21-9 असा रोमांचक विजय मिळवत विजेतेपद पटकावले. दुसऱया गेममध्ये पिछाडीवर गेल्यानंतर त्याने जबरदस्त पुनरागमन करत सामना जिंकला.

यानंतर भगतने सुकांत कदमसोबत जोडी जमवून पुरुष दुहेरीचे सुवर्ण जिंकले. त्यांनी पेरूच्या गेर्सन वर्हास लॉस्टानाऊल आणि डायना रोजास गोलाक यांना 21-13, 21-17 अशा सरळ गेममध्ये पराभूत केले.

मिश्र दुहेरीत (एसएल3-एसयू5) प्रकारात भगतने आरती पाटीलसोबत खेळत तिसरे सुवर्ण जिंकले. या सर्व विजयांनी पुन्हा एकदा तो हिंदुस्थानचा सर्वात यशस्वी पॅरा बॅडमिंटनपटू असल्याचे सिद्ध केले.

दरम्यान, रंजीत सिंगने पुरुष एकेरी (डब्ल्यूएस1), पुरुष दुहेरी (डब्ल्यूएच1- डब्ल्यूएच2), परमजीत सिंगसोबत) आणि मिश्र दुहेरीत (डब्ल्यूएच1- डब्ल्यूएच2), शबाना सोबत) अशा तीन कांस्यपदकांची कमाई केली. नुरुल हुसैन खानने पुरुष एकेरी (डब्ल्यूएच2) मध्ये रौप्यपदक मिळवले, तर उमा सरकारने महिला एकेरी (एसएल3) मध्ये रौप्य आणि आरती पाटीलसोबत महिला दुहेरी (एसएल3-एसयू5) मध्ये कांस्य जिंकले.