Jalna News भरधाव कंटनेरने दोन दुचाकीना उडविले; एकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठार

भरधाव कंटनेरने दोन दुचाकीला पाठीमागुन जोराची धडक दिल्याने तीन जण जागीच ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना 6 ऑक्टोबर सायंकाळी सातच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर महाकाळा गावाजळ घडली. जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयात दाखल केले असून या अपघातामुळे महामार्गावर दुर्तफा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. विकास अन्नासाहेब जाधव (२८), पत्नी साक्षी विकास जाधव ( २२), मुलगा अर्थव विकास जाधव ( ४) हे तिघे या अपघातात ठार झाले.

गेवराई तालुक्यातील उमापुर येथे मयत विकास जाधव यांच्या मामाच्या मुलांचे लग्न आटोपून सायंकाळी होंडा शाईन दुचाकीवरून घराकडे जात होते. त्यावेळी महाकाळा फाट्याजवळ कंटनेरने दुचाकीला पाठीमागुन जोराची धडक देत काही अंतरावर फरफराट नेऊन रस्त्यामधील डिवाडर ओलांडून दुसऱ्या बाजुस नेल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळी नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार मयत साक्षी जाधव गरोदर होत्या, काळानं घाला घातल्याने संपूर्ण कुटुंब या घटनेत मयत झाले.

तर दुसरी दुचाकी क्र.( एम.एच. १६ सी.एल. ९७३७) वरील संतोष बनसोडे(२९), पत्नी मोनिका संतोष बनसोडे (२५) रा.वळदगाव ता. जि., छत्रपती संभाजीनगर येथील असून दोन्ही गंभीर जखमी झाले आहेत. मयत साक्षी जाधव व मुलगा अर्थव जाधव यांना पाचोड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन दाखल केले तर तिसरे मयत विकास जाधव व जखमींना छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्गावर काही वेळ दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती.

घटनास्थळी गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक किरण हवाळे, जमादार रामदास केंद्रे,दिपक भोजने व महाकाळा गावातील ग्रामस्थांनी कंटनेरखाली मयतांना जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यासाठी मदत करून खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीसांना मदत केली