Virar News – एकाच वर्गात शिकणाऱ्या दोन तरुणांनी 18 व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले

विरार पश्चिमेच्या बोळींज येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारून दोन तरुणांनी सामूहिक आत्महत्या केली आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी पोलिसांनी कुठलीही सुसाईड नोट सापडली नाही, त्यामुळे आत्महत्येचे गूढ वाढले आहे. शाम घोरई (20) आणि आदित्य रामसिंग (21) अशी या मुलांची नावे आहेत.

विराच्या बोळींज येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी संध्याकाळी कामगार काम संपवून घरी गेले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास सुरक्षारक्षकाला काहीतरी पडल्याचा जोरदार आवाज आला. त्यावेळी त्यांना दोन तरुणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. याबाबत त्यांनी अर्नाळा सागरी पोलिसांना कळवले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदासाठी पाठविण्यात आले आहेत.

ही दोन्ही मुले नालासोपारा येथील आचोळे परिसरात रहात होती. ते दोघे नालासोपारा येथील राहुल इंटरनॅशनल महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्गात होते. त्यांनी आत्महत्या का केली त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आम्ही याबाबत तपास करत आहोत, असे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.