10 हजारांची नोट झाली एक रुपयाची, इराणने नोटांवरून हटवले चार शून्य

इराणमधील सरकारने ‘रियाल’ चलनातून 4 शून्य काढून टाकण्याचे विधेयक मंजूर केले आहे. वाढत्या महागाईमुळे आर्थिक व्यवहार सोपे करणे आणि बँक नोटांची कार्यक्षमता सुधारणे हा यामागील उद्देश आहे. या बदलामुळे 10,000 रियाल किमतीची वस्तू आता 1 रियालमध्ये मिळेल. जुने आणि नवीन रियाल दोन्ही चलन तीन वर्षांपर्यंत वापरात राहतील.

सध्या इराणची आर्थिक परिस्थिती फारच नाजूक आहे. इराणचे चलन ‘रियाल’ इतके कमकुवत झाले आहे की, ते आता कागदापेक्षाही स्वस्त झाले आहे. एक अमेरिकन डॉलरसाठी तब्बल 11,50,000 रियाल मोजावे लागतात. इराणी नागरिक 10,000 आणि 100000 च्या नोटा घेऊन लहान लहान खरेदी करत आहेत. छोट्या खरेदीसाठी नागरिकांना नोटांचे मोठे पुडके द्यावे लागत आहे. त्यामुळे गडबड उडत आहे. इराणमध्ये महागाईचा दर गेल्या अनेक वर्षांपासून 35 टक्क्यांच्या वर आहे. कधी 40 टक्के, तर कधी 50 टक्क्यांपर्यंतही पोहोचतो. इराणमध्ये आयात जास्त आणि निर्यात कमी असल्यामुळे चलनाचे मूल्य सातत्याने घसरत आहे.