
>> प्रेम प्रशांत साळवी
या भूतलावर सर्वसामान्य माणसांना परमार्थाचा पवित्र मार्ग दाखविण्यासाठी स्वतः ईश्वरच संतरूप धारण करून जनोद्धाराचे कार्य करीत असतात. संत हे ईश्वराचे स्वरूप असल्याकारणास्तव ते नेहमी कलियुगातील मनुष्यांना शाश्वत परमार्थाची जाणीव करून देत असतात. त्यांची प्रत्येक लीला, कार्य व कृती ही धर्माला व भगवंताला अनुसरून असते. असेच राष्ट्रीय संत श्री पाचलेगावकर महाराज यांचे थोर व एकमेव मानस सुपुत्र श्री दत्तानंद स्वामी होते.
सावित्रीबाई चांगदेव सुतार व चांगदेव रामा सुतार यांच्या पोटी 1 डिसेंबर 1941 रोजी दत्त जयंतीच्या पावन मुहूर्तावर श्री दत्तानंद स्वामी यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण हे भक्तिमय व ईश्वर सेवेत व्यतीत झाले. लहानपणापासून त्यांना भगवत भक्तीची प्रचंड ओढ होती. इतर सामान्य मुलांप्रमाणे ते खेळ खेळत नसत. ध्यान, भजन व नामस्मरण यामध्ये रममाण होऊन ते आपला अत्याधिक वेळ व्यतीत करीत. पुढे ब्रह्मभूत श्री संचारेश्वर माऊली यांनी दत्तानंद स्वामी यांना अनुग्रहित करून त्यांना त्यांच्या कार्याची जाणीव करून दिली. गुरूंच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी जनप्रबोधन व भक्तिमय मार्गात सर्वसामान्यांना रममाण करण्याचे कार्य सुरू केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांच्या दर्शनासाठी खामगाव येथे येत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे व दत्तानंद स्वामी यांचाही परिचय झाला होता. एके दिवशी बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब श्री संचारेश्वर स्वामी माऊलींच्या दर्शनासाठी खामगाव येथे आले असताना बाळासाहेबांनी त्यांचे दर्शन घेतले. त्या वेळेस पाचलेगावकर महाराजांनी बाळासाहेबांना सांगितले की, तुमच्या मनात असलेला मराठी माणसावरील अन्यायाविरोधात लढण्याचा विचार योग्य आहे. पुढे शिवसेना, मराठी माणसावरील अन्यायाविरोधात शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुखांनी उभारलेला यशस्वी लढा, शिवसेनेची महाराष्ट्रात सर्वत्र झालेली घोडदौड हा सगळा इतिहास आहे.
श्री संचारेश्वर स्वामी (पाचलेगावकर महाराज) यांनी स्वतःच्या चरणपादुका आपल्या हृदयस्थानी स्पर्श करून दत्तानंद स्वामी यांना प्रदान केल्या. या चरण पादुका दत्तानंद स्वामींच्या निवासस्थानी श्री दत्त आश्रम, माहुलगाव, चेंबूर, मुंबई येथे स्थापित आहेत. दत्तानंद स्वामींच्या छत्रछायेखाली समस्त भक्त मंडळी आनंदी व सुखी आहेत.