कल्याण-डोंबिवलीत आरोग्य सेवेसाठी भीक मांगो, शिवसेना, मनसेसह महाविकास आघाडीचा शास्त्रीनगर हॉस्पिटलवर मोर्चा

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेतील ढिसाळपणामुळे चार दिवसांपूर्वी सर्पदंश झालेल्या चार वर्षांच्या मुलीसह तिच्या मावशीचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर केडीएमसी आरोग्य व्यवस्थेवर टीकेची झोड उठवत आज शिवसेना, मनसेसह महाविकास आघाडीने शास्त्रीनगर हॉस्पिटलवर भीक मांगो मोर्चा काढला. डोंबिवलीतील द्वारका हॉटेलपासून शास्त्रीनगर रुग्णालयापर्यंत काढलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

सर्पदंश झाल्यानंतर श्रुती ठाकूर (२३) आणि प्राणगी भोईर (४) यांना शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे वेळेत उपचार न मिळाल्यामुळे दोघींचाही मृत्यू झाला. यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाचा निषेध करण्यासाठी आणि आरोग्य सेवा बळकट करण्याच्या मागणीसाठी आज मोर्चा काढण्यात आला. भीक द्या, भीक द्या… केडीएमसी आयुक्तांना भीक द्या, खासदार आणि आमदार यांच्याकडून नको दांडिया, नको गरबा, आम्हाला हवी आरोग्य सेवा आदी घोषणांनी शास्त्रीनगर रुग्णालय परिसर दणाणून सोडला. मोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, जिल्हा संघटक तात्या माने, शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, ओमनाथ नाटेकर, विधानसभा संघटक रोहिदास मुंडे, उपजिल्हाप्रमुख रमेश पाटील, राहुल भगत, महिला शहर संघटक अक्षरा पटेल, सुप्रिया चव्हाण, आदित्य पाटील, सुजल म्हात्रे, धनंजय म्हात्रे, उपशहरप्रमुख शाम चौगले, संजय पाटील, प्रमोद कांबळे, सुरेश परदेशी, विजय भोईर, भगवान पाटील, परेश पाटील, मुकेश भोईर, शाखाप्रमुख सचिन जोशी, परेश म्हात्रे, रिचा कामतेकर, मनसेचे प्रकाश भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भालचंद्र पाटील, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव संतोष केणे, सत्यवान म्हात्रे, कम्युनिस्ट पक्षाचे काळू कोमसकर आदी सहभागी झाले होते.

अतिरिक्त आयुक्तांचे लेखी आश्वासन

मावशी आणि मुलीच्या मृत्यू प्रकरणाची सीसीटीव्ही, उपचार रजिस्टर आणि संबंधितांचे जबाब घेऊन सखोल चौकशी केली जाईल. दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिले.