दोन कॉलेज मित्रांनी आठव्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवले; एकच कॉलेज, एकच वर्ग, मृत्यूलाही एकत्र कवटाळले

दोन कॉलेज मित्रांनी आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री विरारच्या बोळींज येथे घडली आहे. शाम घोरई (२०) आणि आदित्य रामसिंग (२१) अशी या मुलांची नावे आहेत. एकच कॉलेज, एकाच वर्गात शिकणाऱ्या या मित्रांनी मृत्यूलाही एकत्र कवटाळले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आत्महत्येचे गूढ वाढले आहे

बोळींज येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सुरक्षारक्षकाला काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. सुरक्षारक्षकाने पाहणी केली असता दोन तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी पोलि सांनी धाव घेतली. मुलांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. याप्रकरणी गुन्हा अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.