
महावितरण व सांगली महापालिका यांच्यातील जागा हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लागल्याने महावितरणला सांगली व मिरज शहरांत तीन वीज उपकेंद्रे उभारणीसाठी जागा उपलब्ध झाली आहे. तर, कुपवाड एमआयडीसी येथे उद्योगांकरिता उभारण्यात येणाऱया उपकेंद्रांच्या जागेचा प्रश्नही मार्गी लागला आहे. यामुळे सांगली व मिरज शहरांतील वीजग्राहकांना अधिक दर्जेदार वीजसेवा मिळणार आहे, अशी माहिती राज्य वीज मंडळाच्या संचालिका नीता केळकर यांनी दिली.
महावितरणच्या विश्रामबाग, सांगली येथील प्रशिक्षण केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता अमित बोकील, शहर विभागाचे कार्यकारी अभियंता आशीष मेहता, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक रमेश आरवाडे उपस्थित होते.
नीता केळकर म्हणाल्या, ‘सांगली शहरातील स्फूर्ती चौक ते आलदर चौक या दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणाची प्रक्रिया ही महावितरणच्या जागा हस्तांतरणासाठी प्रलंबित होती. या जागेच्या बदल्यात सांगली-मिरज-कुपवाड महापालिका महावितरणला चार पर्यायी ठिकाणी जागा देणार आहे. यामुळे शिंदे मळा( ऊर्मिलानगर), कुंभार मळा (वानलेसवाडी), गणी मळा (मिरज) येथे उपकेंद्र उभारणार आहेत. तसेच मिरज शहरात बसेसकरिता ई-चार्ंजग स्टेशनसाठी महापालिका महावितरणला जागा उपलब्ध करून देणार आहे. यामुळे स्फूर्ती चौक ते आलदर चौक दरम्यानच्या रस्तारुंदीकरणाचा विषय मार्गी लागण्याबरोबरच दोन्ही शहरांतील वीजग्राहकांना दर्जेदार वीजसेवा मिळणार आहे. तसेच सांगली-मिरज शहरांतील वीजखांब स्थलांतर करण्याकरिता डीपीडीसी निधीतून 1 कोटी मंजूर होत आहेत.
कुपवाड एमआयडीसी येथेही उपकेंद्र उभारण्याच्या दृष्टीने महावितरण व एमआयडीसी यांच्यात जागा हस्तांतरणाचा विषय लवकरच मार्गी लागणार असून, राज्य वीजमंडळाच्या संचालक मंडळाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. येथे उपकेंद्र उभारल्याने कुपवाड एमआयडीसीमधील औद्योगिक ग्राहकांना वाढीव वीजभार देणे तसेच नवीन उद्योगांना वीजजोडणी देणे शक्य होणार आहे.
शेतीला दिवसा वीज, याबाबत बोलताना नीता केळकर म्हणाल्या, मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेचे काम जिह्यात जलदगतीने चालू आहे. आजअखेर जिह्यात 17 प्रकल्प कार्यान्वित झाले असून, यातून 47 हजार 637 शेतकऱयांना दिवसा वीज मिळत आहे. तर, या प्रकल्पातून 114 मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. यामुळे सांगली जिह्याचा राज्यात तिसरा क्रमांक आहे. जिह्यात अजून 18 प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे, असेही त्यांनी सांगितले.