कोपरगाव कारागृहातील आरोपीचा संशयास्पद मृत्यू, चौकशीची मागणी करत नातेवाईकांचा संताप

कोपरगाव दुय्यम कारागृहात सोमवारी (दि. 6) सायंकाळी एका आरोपीचा मृत्यू झाला. विनोद शिवाजी पाटोळे (वय 34, रा. समतानगर, कोपरगाव) असे या आरोपीचे नाव आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होऊ शकणार आहे. विनोद पाटोळे याच्या नातेवाईकांनी त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे. पाटोळे हा पोस्को गुह्यातील आरोपी होता. दरम्यान, येथील दुय्यम कारागृहात आरोपीचा मृत्यू होण्याची ही दुसरी घटना असून, या पूर्वी सन 2020-21 साली शिर्डी पोलिसांच्या ताब्यातील एक आरोपी मयत झाला होता.

दुय्यम कारागृहात सोमवारी सायंकाळी न्यायालयीन कोठडीतील आरोपी विनोद पाटोळे याचा मृत्यू झाला. त्यावेळी कर्तव्यावर गोलवड शिर्डी पोलीस, डोईफोडे राहाता पोलीस, घनवट कोपरगाव तालुका पोलीस व धोंगडे कोपरगाव शहर पोलीस असे एकूण चार पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पाटोळे याच्या मृत्यूनंतर कारागृह प्रशासनाने पोलिसांना तातडीने माहिती कळवली. त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

कोपरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपासाची सूत्रे हाती घेतली. दरम्यान, मृत आरोपी विनोद पाटोळे यांचा मृतदेह पुणे येथील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, त्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे. या संपूर्ण घटनेची माहिती मानव हक्क आयोग मुंबई यांना कळवावी लागते. त्यामुळे पोलीस यंत्रणेसह तुरुंग अधिकाऱयांचे धाबे दणाणले आहे.

दरम्यान, मृत पाटोळे याच्या नातेवाईकांनी पोलीस प्रशासन, तुरुंग अधिकारी कारागृह प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया नोंदवली. या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱयांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.