वकिलाच्या धाडसाचं कौतुक, भाजप नेत्याने सरन्यायधीशांवर हल्ला करणाऱ्याची केली प्रशंसा

सरन्यायधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी सुनावणीदरम्यान वकिल राकेश किशोर यांनी बूट फेकण्याचा प्रयत्न केला. देशभरातून किशोर यांच्या कृत्याचा निषेध होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या कृत्याचा निषेध केला. असे असताना भाजपचे कर्नाटकमधील नेते आणि बंगळुरूचे माजी पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी मात्र किशोर यांच्या कृत्याची प्रशंसा केली आहे. याबाबत राव यांनी X वर एक पोस्ट शेअर केली होती मात्र नंतर त्यांनी ती डिलीट केली.

”भलेही त्यांनी केलेले कृत्य हे कायदेशीररित्या अत्यंत चुकीचे असले तरी त्यांच्या धाडसाचं मी कौतुक करतो. या वयात परिणामांचा विचार न करता आपण आपल्या तत्वांसाठी उभं राहिलात व त्यावर ठामही राहिलात”, अशी पोस्ट भास्कर राव यांनी केली होती. त्यांच्या या पोस्टने मोठा वाद निर्माण केला होता. नंतर त्यांनी ती पोस्ट डिलीट केली.

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी सुरू असताना एका वकिलाने ‘सनातन का अपमान नही सहेगा हिंदुस्थान’ अशा घोषणा देत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्याला वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.