
‘अमित शहा हे स्वतःच पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत. त्यांच्यावर अति विश्वास ठेवू नका, वेळीच सावध व्हा. ते तुमच्यासाठी मीर जाफर ठरतील,’ असा धोक्याचा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान मोदींना दिला.
मतदार फेरछाननीच्या नावाखाली निवडणूक आयोग शहा सांगतील तेच करत आहे, असा आरोप त्यांनी केला. भाजपचे नेते दिल्लीत बैठका घेतात आणि इथे येऊन बंगालमध्ये अमूक अमूक इतके मतदार वगळले जाणार असे जाहीर करतात. त्यावर ममतांनी आक्षेप घेतला.
कोण होता मीर जाफर?
मीर जाफर हा हिंदुस्थानच्या इतिहासातील गद्दारीचे प्रतीक मानला जातो. जाफर हा 18 व्या शतकातील बंगालचा नवाब सिराजुद्दौलाच्या सैन्याचा प्रमुख होता. त्याने गुप्तपणे ईस्ट इंडिया पंपनीशी हातमिळवणी केली. प्लासीच्या लढाईत तो इंग्रजांना जाऊन मिळाला आणि सिराजुद्दौलाचा पराभव झाला. तिथेच हिंदुस्थानात ब्रिटिश राजवटीचा पाया बळकट झाला. इंग्रजांनी नंतर मीर जाफरला बंगालचा नवाब घोषित केले.