
बुधवारी, 8 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात लावण्यात आलेल्या बेकायदेशीर बॅनर्सवरून वाद निर्माण झाला आहे. या बॅनर्समुळे मुंबई शहराचे विद्रुपीकरण झाल्याचा आरोप करत, शिव विधी आणि न्याय सेना या संघटनेने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना एक पत्र लिहून हरकत नोंदवली आहे. या बॅनर्सवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच स्वतः नार्वेकर यांचेही फोटो असल्याने, या प्रकरणात त्यांनी लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अनेक बॅनर्स लावण्यात आले होते. हे बॅनर्स फूटपाथ, रोड डिव्हाइडर्स आणि रस्त्यांच्या कडेला लावले गेले होते. शिव विधी आणि न्याय सेना यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, हे बॅनर्स बेकायदेशीर असून, त्यांच्यावर मुंबई महानगरपालिकेकडून घेतलेल्या परवानगीचा कोणताही तपशील (QR कोड किंवा लेखी परवानगी) नव्हता. या बॅनर्सवर नार्वेकर यांच्यासह अनेक महत्त्वाच्या संवैधानिक पदांवरील नेत्यांचे फोटो होते.
न्यायालयाच्या आदेशाचा भंग
या पत्रात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचा संदर्भ देण्यात आला आहे. 2011 साली दाखल झालेल्या जनहित याचिकेमध्ये (PIL no. 155 of 2011) उच्च न्यायालयाने बेकायदेशीर बॅनर्स आणि होर्डिंग्जवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशांची आजही अंमलबजावणी होत नसल्याचे पत्रात म्हटले आहे. तसेच, न्यायालयाने 21 फेब्रुवारी 2024 रोजी पुन्हा एकदा स्पष्ट केले होते की, स्ट्रीट लाईट, फूटपाथ आणि रस्त्यांवर असे बॅनर्स लावण्यास परवानगी नाही. असे असतानाही, मुंबईत आजही सर्रासपणे हे प्रकार सुरू आहेत. हा न्यायालयाचा अवमान (Contempt of Court) असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
दक्षिण मुंबईत काल बेकायदेशीर बॅनर्समुळे मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण झालं. या बॅनर्सवर संविधानिक पदांवरील नेत्यांचे, तसेच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचेही फोटो झळकले होते. या बाबत शिव विधी आणि न्याय सेना यांनी राहुल नार्वेकर यांच्या कडे हरकत नोंदवली .@ShivsenaUBTComm pic.twitter.com/wpluTEJHMl
— Shiv Vidhi Nyay Sena(Maharashtra). Shivsena UBT (@shivvidhisena) October 9, 2025
घाटकोपर घटनेचा उल्लेख
या पत्रात घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्या घटनेनंतरही बेकायदेशीर बॅनर्सची संस्कृती सुरूच असल्याबद्दल पत्रात खेद व्यक्त करण्यात आला आहे. अशा बेकायदेशीर बॅनर्समुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होतो आणि अनेक अपघातही घडतात.
या गंभीर परिस्थितीत नार्वेकर यांनी हस्तक्षेप करून राज्य सरकारला मुंबई आणि राज्यातील इतर शहरांचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी तसेच, नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती पत्राच्या शेवटी करण्यात आली आहे.