
कोजागिरीच्या चांद्रमुहूर्तावर सोमवारी रात्री विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात रंगलेल्या ’तोच चंद्रमा नभात’ या सुरेल मैफलीला संगीतप्रेमींचा तुडुंब प्रतिसाद मिळाला. महाकवी ग. दि. माडगूळकर आणि कवयित्री शांता शेळके यांनी शब्दबद्ध केलेल्या अवीट गोडीच्या गीतांच्या सुरेल सादरीकरणामुळे रसिकश्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
मंदार आपटे, नचिकेत देसाई, धनश्री देशपांडे आणि केतकी भावे-जोशी या गायकांनी ही मैफल गाजवली. प्रशांत लळीत यांनी संगीत संयोजन केले. अनघा मोडक यांच्या निवेदनाने रसिकांची मने जिंकली.
वर्षभरात 1200 विविध कार्यक्रम होणार
विख्यात सतारवादक पं. रवी चारी यांनी सर्व कलाकारांचे कौतुक केले. ‘मराठी भावगीतांच्या परंपरेला जपणारे असे कार्यक्रम होत राहावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर, सांस्कृतिक विभागातर्फे वर्षभरात असे 1200 विविध कार्यक्रम केले जातील, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिली. यावेळी आमदार संजय पोतनीस, पराग आळवणी हे उपस्थित होते.