
जाती-धर्माच्या नावाखाली सत्ताधारी समाजामध्ये फूट पाडत आहेत. धर्माच्या आधारे कदाचित तुमच्या हाती सत्ता येईल. मात्र त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे भले होणार आहे काय, असा थेट सवाल प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडून आता हक्काची लढाई लढण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी, कष्टकरी तसेच दिव्यांगांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांनी राज्यभर हक्क यात्रा सुरू केली आहे. त्यासाठी आज ते अलिबागमध्ये आले होते. पक्षाच्या कार्याल याचे उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील सरकारवर टीकेची झोड उठवली. सर्वसामान्यांना न्याय मिळेपर्यंत आपली लढाई सुरूच राहील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य जनतेच्या रक्षणासाठी जीवाचे रान केले. पण सध्याचे राजकारणी केवळ जात, पात, धर्माच्या नावावर राजकारण करीत आहेत. कोणीही दिव्यांगांच्या प्रश्नावर विधानभवनात बोलत नाही. त्यांना मतदारांपेक्षा आपला पक्ष महत्त्वाचा वाटतोय. अशावेळी जनतेसाठी लढणार कोण, असा सवाल बच्चू कडू यांनी केला. न्याय हक्क आणि अर्थकारणाची लढाई लढण्याची गरज असल्याचे कडू यांनी सांगितले.