कोल्हापूर महापालिकेसमोर ‘धूळफेक आंदोलन’, धुळीच्या प्रश्नावर ‘आप’कडून निषेध

नवीन रस्ता करताना आणि पॅचवर्क केल्यानंतर त्यावर टाकण्यात येणारी खडी तसेच शहरभर पडलेल्या खड्डय़ांमुळे हवेत धुळीचे साम्राज्य पसरले आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असून, नाका-तोंडात धूळ जाऊन नागरिक आजारी पडत आहेत. धुळीच्या त्रासाने वाहनचालकांना मास्क लावून फिरायची वेळ आली आहे. प्रशासकीय अधिकारी चारचाकीतून फिरत असल्याने त्यांना ही दुर्दशा दिसत नाही. त्यामुळे रस्त्यावर पसरलेली खडी आणि धूळ थेट महापालिकेच्या मुख्य गेटसमोर ओतून आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘धूळफेक’ आंदोलन करून निषेध नोंदविला.

पावसाळ्यात मुरुम टाकून केलेली तात्पुरती डागडुजी, पावसाने वाहून आलेली माती, उखडलेले पॅचवर्क, यामुळे हवेत धुळीचे प्रमाण वाढले आहे. केंद्राच्या ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा’ कार्यक्रमातून गेल्या दोन वर्षांत अठरा कोटी रुपये खर्च झाले. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निधी खर्च करूनही शहरातील धुळीचा प्रश्न गंभीर होत आहे. चौकाचौकांत लावलेले मिस्ट टॉवर बंद आहेत. हवेतील धुलिकण कमी करण्यासाठी महापालिकेने स्प्रिंकलर वाहन घेतले आहे, ते नेमके कुठे वापरले जाते, याचे उत्तर अधिकारी देतील का? असा प्रश्न ‘आप’चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला. यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, उषा वडर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

राजारामपुरीत खड्ड्यात झोपून निषेध

– राजारामपुरी परिसरातील महापालिकेच्या विभागीय कार्यालयाखालील रस्त्यावर तुंबलेल्या ड्रेनेजच्या सांडपाण्यात अधिकऱयांना उभे करून तसेच खड्डय़ात झोपून राजारामपुरी येथील नागरिकांनी महापालिका कारभाराचा निषेध केला. दहा ते बारा कोटी घरफाळा देणाऱया या परिसरात किती वर्षे रस्ते झालेले नसल्याचे सांगून पॅचवर्क तसेच अनेक रस्ते पावसाने वाहून गेले आहेत. मोकाट जनावरे आणि कचऱयाचे ढीग यावरून अधिकाऱयांना नागरिकांनी खडसावले. उपशहर अभियंता अरुण गुजर, मीरा नगीमे, पद्मल पाटील यांना रस्त्यावर साचलेल्या ड्रेनेजच्या पाण्यातून चालण्यास भाग पाडले. तसेच रस्त्यांवरील खड्डय़ात झोपून ‘आमच्या सुंदर राजारामपुरीचे अधिकाऱयांनो, तुम्ही केले वाटोळे’, असे फलक घेऊन अधिकाऱयांचा निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महेश उत्तुरे यांच्यासह ऍड. बाबा इंदुलकर, अनिल घाडगे, अनिल कदम, काका पाटील आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.