
राज्यातील मतचोर सरकार वाळूमाफियांच्या टोळ्या पोसत असल्याने कारवाई करणार्या अधिकार्यांचा जीव धोक्यात आला आहे. यातच जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात वाळूमाफियांनी प्रचंड धुमाकूळ घातला असून, बुधगाव येथे वाळूचोरीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यावर वाळूमाफियाने जीवघेणा हल्ला करीत टॅ्रक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
तापी नदीच्या बुधगाव ते जळोद दरम्यानच्या पुलाखाली वाळूची चोरी होत असल्याची गोपनीय माहिती अमळनेर प्रांत अधिकार्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार हातेड भागातील मंडळाधिकारी रवींद्र माळी यांच्या नेतृत्वाखाली ग्राम महसूल अधिकारी अनंत माळी, संतोष कोळी, वर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सुधाकर महाजन, अकुलखेडेचे नीलेश पवार आणि बुधगावचे भूषण पवार यांचे पथक रविवारी पहाटे ४ वाजता कारवाईसाठी रवाना झाले.
बुधगाव गावाच्या हद्दीत, बुधगाव ते जळोद रस्त्यावरील पुलाखाली तापी नदीपात्रात पथकाला एक ट्रॅक्टर वाळू भरून येताना दिसला. पथकाने ट्रॅक्टरजवळ पोहोचून चालकाची चौकशी केली असता, तो ट्रॅक्टर अजय कोळी यांचा असल्याचे चालकाने सांगितले आणि पळून गेला.
सदर ट्रॅक्टर जमा करून चोपडा तहसील कार्यालयात नेत असताना, ग्राम महसूल अधिकारी अनंत माळी ट्रॅक्टरवर बसले होते. यावेळी ट्रॅक्टर चालक विजय पावरा आणि ट्रॅक्टर मालक अजय कैलास कोळी (दोघेही रा. बुधगाव) यांनी रस्त्यात अडथळा निर्माण केला आणि ट्रॅक्टर घेऊन जाऊ देणार नाही, असे सांगत वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. चालक विजय पावरा याने ट्रॅक्टरवर बसलेल्या अनंत माळी यांची कॉलर पकडून त्यांना खाली ओढले आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने थेट ट्रॅक्टरच्या मागील चाकासमोर फेकून दिले.
मंडळाधिकार्याच्या प्रसंगावधानाने जीव वाचला
मंडळाधिकारी रवींद्र माळी यांनी प्रसंगावधान राखून अनंत माळी यांना बाजूला ओढले. त्यामुळे माळी यांचा जीव वाचला. मात्र पायाला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली. यानंतर चालक विजय पावरा आणि मालक अजय कोळी यांनी ट्रॅक्टरमधील वाळू ओतून ट्रॅक्टर घेऊन पळ काढला.
जखमी झालेले ग्राम महसूल अधिकारी अनंत माळी यांना उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंडळाधिकारी रवींद्र माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक विजय पावरा आणि मालक अजय कोळी यांच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे आणि इतर गंभीर कलमांखाली चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























































