वाडा-भिवंडी-मनोर महामार्गावर धुळवड, प्रवाशांना श्वसन, डोळ्यांचे विकार

वाडा-भिवंडी-मनोर या महामार्गावरील रस्त्याची अक्षरशः दैना झाली आहे. खड्डे चुकवताना वाहन चालकांच्या नाकीनऊ आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या महिन्याभरापासून येथील रस्त्याचे अनेक ठिकाणी काम सुरू आहे. खड्यांमध्ये डांबरऐवजी मातीमिश्रित खडी टाकल्यामुळे रस्त्यावर धुराळा उडत आहे. ही धुळवड प्रवाशांच्या नाकातोंडात जाऊन श्वसन व डोळ्यांचे विकार होऊ लागले आहेत.

वाडा-भिवंडी-मनोर या महामार्गाची पावसात प्रचंड दुर्दशा झाली आहे. या महामार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे खड्डे चुकवताना हैराण झालेल्या वाहनचालकांना आता नवीन समस्येला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांवर टाकलेली माती काही दिवसांतच उखडली आणि वाडा-भिवंडी-मनोर महामार्गावर खड्ड्यांचे जाळे निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी विविध पक्ष-संघटनांनी आंदोलने केली आहेत. मात्र येथील नागरिकांच्या पदरी निराशाच आली आहे.

आरोग्य धोक्यात

महामार्गावरून दररोज हजारो दुचाकीस्वार तसेच प्रवासी विविध कामांनिमित्त प्रवास करतात. या मार्गावरून प्रवास वाहनचालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. श्वसन, दम्याचे आजार, सर्दी, डोळ्यांचे विकार आदी आजार बळावत आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे. वाहनचालक आणि प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करून महामार्गावरील धुळीची समस्या दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी सामाजसेवक श्रीकांत भोईर यांनी केली आहे.