तुर्भ्यात जुन्या वादातून तरुणाची हत्या; दोघे गंभीर

जुना वाद मिटवायचा आहे, असा निरोप पाठवून तिघांना बोलावून घेतले आणि त्यांच्यावर लाठ्या-काठ्या, विटांनी हल्ला केल्याची घटना तुर्भे गावात घडली आहे. या हल्ल्यात एक तरुणाचा मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर तुर्भे गावातील नागरिकांनी वाशी येथील एमजीएम रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली होती. तुर्भे गावात तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

तुर्भे येथील सेक्टर २१ मधील रहिवासी किशोर वरक, विकी कांबळे आणि आशुतोष धुर्वे यांना विकी पाटील, संकेत लाड, ओंकार वाघमारे, विघ्नेश घरत, शकील मौला, चारुशीला पाटील यांनी जुना वाद मिटवायचा आहे, असे सांगून बोलून घेतले. हे तिघेही वाद मिटवण्यासाठी गेले असता त्यांच्यावर लाठ्या-काठ्या, लोखंडी रॉड आणि विटांनी हल्ला केला. यात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना किशोर वरक याचा मृत्यू झाला. त्यानंतर तुर्भे गावातील नागरिकांनी रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली. गावातील वातावरणही तणावग्रस्त बनले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तुर्भे गावात कडक बंदोबस्त ठेवला आहे.