
महायुती सरकारने मोठा गाजावाजा करत मेट्रो-3 ही भुयारी मेट्रो सुरू केली. मात्र ही जागतिक दर्जाची सेवा पुरवताना मेट्रो स्थानकांबाहेरचा अंधार दूर करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. अनेक स्थानकांबाहेर रस्त्यावर दिवेही अंधुक प्रकाशाचे असल्याने प्रवाशांना असुरक्षित वाटत आहे. रिक्षा स्टॅण्डचीही सोय नसल्याने तिथून घरी परतण्यास वाहनाची तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत.
भुयारी मेट्रोच्या आरे-जेव्हीएलआर स्थानकाबाहेर पुरेसा प्रकाश देणारे दिवेच लावले गेलेले नसल्याने परिसर अंधारमय झाला आहे. त्या अंधारातच प्रवाशांना पुढील मार्गक्रमणा करण्याचा नाइलाज झाला आहे. संध्याकाळनंतर गर्दीच्या वेळी त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तेथून सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधाही मर्यादित असल्याने रिक्षा मिळण्यास अक्षरशः मारामारी होत आहे.
आरे-जेव्हीएलआर स्थानकाबाहेर पडल्यानंतर मुख्य जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर (जेव्हीएलआर) जाण्यासाठी प्रवाशांना मंद प्रकाश असलेल्या रस्त्यावरून चालावे लागते. भुयारी मेट्रोच्या गाडय़ा आरामदायी आहेत, पण स्थानकाबाहेर पडल्यानंतर घर गाठणे म्हणजे दिव्य असल्याचे प्रवासी सांगतात.
रिक्षासाठी तासन्तास खोळंबा
जेव्हीएलआरमध्ये राहणाऱ्या सुरेखा पाटोळे यांनी आपल्याला रिक्षा किंवा कॅब मिळवण्यासाठी अर्धा ते एक तास प्रतीक्षा करावी लागते असे सांगितले. अंधुक दिव्यांमुळे महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न असल्याचे त्या म्हणाल्या. प्रदीप पाटणकर यांचीही तीच व्यथा आहे. मेट्रोमध्ये चढण्यापूर्वीच कॅब बुक केल्याशिवाय पर्याय राहत नाही असे ते सांगतात.
पादचारी पुलाअभावी क्रॉसिंग करणे जीवघेणे
आरे-जेव्हीएलआर स्थानकाबाहेर रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नल किंवा पादचारी पुलाची आवश्यकता असल्याचे प्रवाशांनी सांगितले. बरोबरच पार्किंगचीही व्यवस्था करायला पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. अंधार असल्याने रस्त्यावर प्रवासी वाट पाहताहेत हे रिक्षावाल्यांनाही दिसत नसल्याने ते वेगाने निघून जातात, अशा अनुभवांना त्यांना सामोरे जावे लागत आहे.