
डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील निर्माल्य खत प्रकल्पातून गेल्या काही दिवसांपासून तीव्र दुर्गंधी पसरत असल्याने स्थानिक रहिवासी, व्यापारी, रुग्णालय तसेच परिसरातील नागरिकांचे डोके उठले होते. यासंदर्भात नागरिकांनी गणेश मंदिर संस्थांकडे तक्रारी नोंदवल्यानंतर संस्थांने तत्काळ दखल घेत जेसीबीच्या सहाय्याने निर्माल्याचा ढीग हलवून परिसरात जंतुनाशक फवारणी केली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
निर्माल्य खत प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवलेल्या पिंपांमध्ये निर्माल्य टाकण्याऐवजी काही नागरिक कपडे टाकतात. अशा वस्तूंमुळे जैविक खत तयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. तसेच प्रकल्पावर कार्यरत कामगारांना आरोग्यविषयक त्रासही सहन करावा लागतो. तसेच खत तयार करण्यात अडचणी येऊन दुर्गंधी पसरते. आताही दुर्गंधी पसरल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने निर्माल्याचा ढीग हलवून जंतुनाशक फवारणी केली.
प्लास्टिक टाळा पर्यावरणपूरक
पद्धतीने निर्माल्य व्यवस्थापन करण्यासाठी नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा आणि प्रकल्प परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन गणेश मंदिर संस्थांचे विश्वस्त प्रवीण्श दुधे, प्रकल्प समन्वयक विजय घोडेकर आणि राजू नलावडे यांनी केले आहे.