मीरा-भाईंदर पालिकेच्या नळातून गटाराचे पाणी, उत्तनवासीयांचे आरोग्य धोक्यात

मीरा-भाईंदर पालिकेच्या नळातून गटाराच्या काळ्याकुट्ट पाण्याचा पुरवठा होत असल्याची संतापजनक बाब उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे या फेसाळलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या दूषित पाण्यामुळे उत्तनवासीयांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांनी त्याविरोधात संताप व्यक्त केला आहे. पालिकेने तत्काळ उपाययोजना करून शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी यावेळी उत्तनवासीयांनी केली आहे.

भाईंदर पश्चिमेतील उत्तनच्या पाली बंदर व शांतीनगर परिसरात महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या दोन दिवसांपासून गटाराचे पाणी येत आहे. काळ्याकुट्ट पाण्यामुळे येथील नागरिक हैराण झाले असून त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. केवळ पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला. ही वाहिनी दुरुस्त करून तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक दत्तात्रय जाधव यांनी महापालिकेकडे केली. संतप्त रहिवाशांनी पाणीपुरवठा विभागाला याची माहिती देत जाब विचारला असता अधिकाऱ्यांची पळापळ झाली. प्रभागात रस्ता आणि गटार बांधण्याचे काम सुरू असल्यामुळे लिकेज पाइपलाइनमुळे गटाराचे पाणी येत असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

गळक्या पाइपचा शोध सुरू

गळक्या पाइपलाइनचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी इंजिनीयरसह एका पथकाची रवानगी केले आहे. या पथकाकडून गळक्या पाइपलाइन, गटाराजवळील व्हॉल्व याचा तपास सुरू केला आहे. लवकरच लिकेज शोधून त्यावर उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.