योजना बंद करणारं ‘चालू’ सरकार! शिंदेंच्या आणखी एका योजनेवर फडणवीसांची ‘फुली’, अंबादास दानवेंनी यादीच मांडली

महायुती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सुरू केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या एक-एक योजना बंद करण्याचा किंवा थंड बस्त्यात टाकण्याचा सपाटा सुरू केला आहे. आनंदाचा शिधा योजना निधी अभावी बंद झाल्यानंतर आता फडणवीस सरकारने ‘माझी सुंदर शाळा’ योजना बंद केल्याचे वृत्त आहे. यामुळे मिंधे गटाला धक्का बसला आहे. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी फडणवीस यांनी शिंदेंच्या कोणत्या योजना बंद केल्या याची यादीच सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. आमच्यातून गेलेले ‘कटप्रमुख’ मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील, असा खणखणीत टोला अंबादास दानवे यांनी हाणला. सोबतच त्यांनी शिंदेंच्या कोणत्या योजना बंद केल्या याची यादीही शेअर केली.

पालिका निवडणुकीवरून महायुतीत अस्वस्थता, फडणवीसांचा ‘स्वबळाचा’ संदेश; शिंदे, अजितदादा गटाला टेन्शन

शिंदेंच्या या योजना बंद

१. आनंदाचा शिधा- बंद!
२. माझी सुंदर शाळा – बंद!
३. १ रुपयात पीकविमा – बंद!
४. स्वच्छता मॉनिटर – बंद!
५. १ राज्य १ गणवेश – बंद!
६. लाडक्या भावाला अपरेंटीसशिप – बंद!
७. योजनादूत योजना – बंद!
८. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना – बंद!

योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे. निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू, असेही अंबादास दानवे यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले.