घरच्या घरी बनवा सुगंधित दिवे, पर्यावरणपूरक सुगंधी दिव्यांची क्रेझ

प्रकाशाचा सण असलेली दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. या दिव्यांपासून पर्यावरणाची हानी होत नाही. शिवाय हे दिवे केवळ उत्सवाचे सौंदर्य वाढवत नाहीत तर नैसर्गिक सुगंध सोडतात. त्यामुळे या दिव्यांना चांगलीच पसंती मिळत आहे.

सध्या बाजारात मिळणाऱ्या कृत्रिम दिव्यांच्या दुष्परिणामांची माहिती नसल्याने ग्राहक हे दिवे खरेदी करतात, मात्र यामुळे प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता असते. तेल व तुपाने दिवे लावताना नासाडी होते. त्यामुळेच पर्यावरणपूरक दिव्यांचा पर्याय समोर आला आहे. विशेष म्हणजे हे दिवे आपल्या घरातच बनवता येतात. हे दिवे बनवण्यासाठी मेणबत्ती ही ओरिजनल मेण वापरून बनवलेली असेल तर अधिक चांगले राहील. मेणबत्तीऐवजी तुम्ही या ठिकाणी वनस्पती किंवा तूप वापरू शकता. लक्ष्मीपूजनासाठी बनवत असल्यास घरगुती तूप वापरा. बाहेरील ठिकाणी लावण्यासाठी मेणबत्ती आणि वनस्पती तूप वापरू शकता. त्यानंतर लिंबाचा रस, एखादे सुगंधित तेल, फुलवाती आणि आपल्याला ज्या आकारात दिवे तयार करायचे आहेत त्या आकाराचे कोणतेही भांडे चालेल. अगदी छोटे स्टील, जर्मन भांडे वापरूनदेखील हे दिवे तुम्ही बनवू शकता.