कोयना, साईनगर शिर्डी एक्प्रेसवर दगडफेक

मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या कोयना एक्प्रेस व साईनगर शिर्डी एक्प्रेसवर माथेफिरूंनी दगडफेक केल्याची संतापजनक घटना बदलापूर – वांगणीदरम्यान घडली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. या दगडफेकीमुळे एक्प्रेसच्या काचा फुटल्या आहेत.

पहाटे पावणेसहाच्या सुमारास अंबरनाथ रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर कोयना एक्प्रेस मुंबईच्या दिशेने निघाली. गाडी अंबरनाथ-बदलापूर स्टेशनदरम्यान अचानक दगडफेक सुरू झाली. तर सकाळी साडेदहाच्या सुमारास वांगणी रेल्वे स्टेशन परिसरात साईनगर शिर्डी एक्प्रेसवर माथेफिरूंनी दगडफेक केली. या दोन्ही घटनांमध्ये गाडय़ांच्या खिडकीच्या काचा फुटल्या. एकाच दिवसात दोन ठिकाणी घडलेल्या या घटनेनंतर प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण होते. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून रेल्वे सुरक्षा बल आणि कल्याण रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. हल्लेखोरांनी दगडफेक केल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्यांचा शोध घेण्यासाठी कल्याण रेल्वे पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.