सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्याला अटक

सरकारी विभागात शिपायाची नोकरी लावतो, अशी बतावणी करत एका तरुणाची  दोन लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस मरीन ड्राईव्ह पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. हिम्मतराव निंबाळकर (40) असे आरोपीचे नाव असून त्याला फलटणहून उचलण्यात आले.

गेल्या वर्षी आमदार निवासातल्या उपाहागृहामध्ये हिम्मतराव निंबाळकर हा तक्रारदाराला भेटला होता. मंत्रालयात कामाला असून माझी मोठी ओळख आहे, असा दावा त्याने केला होता. यावेळी त्याने तक्रारदाराच्या भावाला साताऱ्यातील सत्र न्यायालयात शिपाई म्हणून नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले होते. विश्वास बसावा यासाठी आरोपीने तक्रारदाराला बनावट नियुक्तीपत्रक दाखवले हेते. यानंतर पुढील प्रक्रियेसाठी दोन लाखांची मागणी केली होती. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने दोन लाख रुपये देऊ केले.  त्यानंतर निंबाळकरने त्यांना टाळण्यास सुरू केले. आपली फसवणुक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात येताच त्याने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर फेब्रुवारीपासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. अखेर आरोपी फलटण येथे असल्याचे समजताच पोलिसांनी त्याला तेथून उचलले.