पदोन्नतीच्या नावाखाली लोको पायलटची पिळवणूक, रेल कामगार सेना आक्रमक; प्रशासनाविरुद्ध ’निषेध मोर्चा’ काढणार

मध्य रेल्वे मार्गावरील मोटरमनची रिक्त पदे भरण्यासाठी रनिंग स्टाफमधील लोको पायलटना पदोन्नती दिली जात आहे. मात्र त्या लोको पायलटच्या जागी नवीन नियुक्ती केली जात नसल्याने कार्यरत लोको पायलटवर कामाचा ताण वाढला आहे. पदोन्नती दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त ठेवण्याच्या रेल्वे बोर्डाच्या धोरणाविरोधात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून लोणावळ्यापर्यंत रनिंग स्टाफमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या प्रश्नावर रेल कामगार सेना आक्रमक झाली असून दिवाळीनंतर प्रशासनाविरुद्ध ‘निषेध मोर्चा’ काढणार असल्याचा इशारा दिला आहे.

या मार्गावरील मोटरमनच्या जवळपास 300 जागा रिक्त आहेत. त्याजागी नवीन भरती न करता लोको पायलटना पदोन्नती देण्यात येत आहे. सद्यस्थितीत 150 जणांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया सुरु आहे. सीनिअर डीईई हेमंत जिंदाल यांनी मोटरमनच्या रिक्त जागा भरण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. मात्र पदोन्नती दिलेल्या लोको पायलटच्या जागा रिक्त ठेवल्या जात असल्याचा सुरक्षेवर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. शिवसेना नेते आणि रेल कामगार सेना अध्यक्ष विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली रेल कामगार सेना आंदोलन करणार आहे.

रेल्वेच्या 7 डेपोंमध्ये बैठकांचा धडाका

पदोन्नती देतानाच लोको पायलटच्या जागीही नवीन भरती करणे गरजेचे होते. तसे करण्यास भाग पाडण्यासाठी मध्य रेल्वेच्या सात डेपोंमध्ये बैठकांचा धडाका सुरू आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील दोन डेपो (मेन आणि उपनगरी लाईन), कुर्ला, कल्याण येथील उपनगरी आणि मालवाहतूक, पनवेल उपनगरी आणि मालवातूक, लोणावळा व इगतपुरी, नेरळ यांचा समावेश आहे.

रेल्वे प्रशासन सहाय्यक चालक, मालगाडी चालक, शंटर यांना नियमांची मर्यादा ओलांडून काम करण्यास भाग पाडत आहे. सर्व रनिंग शाखेचे कर्मचारी शारीरिक आणि मानसिक दबावाखाली अतिरिक्त काम करीत आहेत. कर्मचाऱ्यांना सुट्टी, साप्ताहिक रजा तसेच इतर अनेक मूलभूत हकांपासून वंचित ठेवले जात आहे, असे रनिंग शाखा प्रमुख, मुंबई डिव्हिजन प्रशांत कमानकर सांगितले.