दुसऱ्याशी बोलते म्हणून प्रेयसीवर हातोड्याचे घाव, विकृत प्रियकराला अटक

दुसऱ्याशी बोलते या रागातून माथेफिरू प्रियकराने प्रेयसीवर हातोड्याने घाव घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तब्बल दोन तास माथेफिरू प्रेयसीला मारहाण करत होता. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अलिबाग पोलिसांनी सूरज बुरांडे या विकृत प्रियकराला अटक केली आहे.

थेरोंडा येथील सूरज बुरांडे हा प्रेयसीला घेऊन अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर मंदिर येथे गेला होता. दोघेही मंदिर परिसरात एका झाडाखाली गप्पा मारत बसले होते. यावेळी प्रेयसीला फोन आला. तू फोनवर कुणासोबत बोलतेस, असा जाब सूरजने तिला विचारला. यावरून दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. त्यानंतर सूरजने बॅगेत असलेला हातोडा बाहेर काढला आणि प्रेयसीच्या डोक्यावर आणि कपाळावर हल्ला केला. यानंतर सूरज प्रेयसीला खेचत घेऊन दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला आणि तेथेही तिला मारहाण केली. या मारहाणीत तरुणी गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. जखमी तरुणीला तत्काळ अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.