
डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील मॉडेल स्कूलजवळ असलेले धर्मवीर आनंद दिघे उद्यान तीन महिन्यांपासून कुलूपबंद आहे. त्यामुळे परिसरातील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा हिरमोड झाला आहे. पालिकेने सुरक्षारक्षकांची नेमणूक न केल्याने उद्यान बंद आहे. परिणामी उद्यानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले असून परिसरात अस्वच्छता पसरली आहे.
पालिकेने उद्यानावर लाखो रुपयांचा खर्च केला होता. तरीदेखील सध्या उद्यानाची अवस्था दयनीय आहे. सुरक्षारक्षकांअभावी उद्यान वारंवार बंद ठेवले जाते. त्यामुळे मुलांच्या खेळण्या- बागडण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांना सकाळी – संध्याकाळी फिरण्यासाठी हक्काचे ठिकाण नाही. यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपतालुकाप्रमुख भालचंद्र म्हात्रे, उपविभागप्रमुख मंदार स्वर्गे, शाखाप्रमुख सागर पाटील आणि माजी विभागप्रमुख राजू नलावडे यांनी महापालिका उद्यान विभागाकडे निवेदन देऊन तत्काळ उद्यान सुरू करण्याची मागणी केली आहे. कायमस्वरूपी सुरक्षारक्षकांची नेमणूक न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.