
स्टार फलंदाज पृथ्वी शॉसह अर्शिन कुलकर्णी, सिद्धेश वीर व कर्णधार अंकित बावणे या महाराष्ट्राच्या फलंदाजांना रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत उद्घाटनाच्या दिवशी भोपळाही फोडता आला नाही. केरळच्या गोलंदाजीपुढे आघाडीच्या फळीने सपशेल शरणागती पत्करल्यानंतर ऋतुराज गायकवाड (91) आणि जलज सक्सेना (49) यांनी दबावातही झुंजार फलंदाजी करत महाराष्ट्राला पहिल्या डावात सावरत 59 षटकांत 7 बाद 179 धावसंख्येपर्यंत पोहोचविले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विकी ओस्तवाल 10, तर रामकृष्ण घोष 11 धावांवर खेळत होते.
धावफलक कोरा असताना तीन फलंदाज बाद
केरळने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेला निर्णय अतिशय रास्त ठरला. एम.डी. निधीशने पहिल्याच षटकातील चौथ्या व पाचव्या चेंडूवर अनुक्रमे पृथ्वी शॉ (0) व त्याच्या जागेवर आलेल्या सिद्धेश वीरला (0) बाद करून केरळला सनसनाटी सुरुवात करून दिली. त्यानंतर एन. बसीलने दुसरा सलामीवीर अर्शिन कुलकर्णी यालाही शून्यावर बाद करून महाराष्ट्राचा धावफलक कोरा असतानाच 3 बाद अशी दुर्दशा केली. बसीलने पुढच्या षटकात कर्णधार अंकित बावणेला शून्यावर बाद केले, तर निधीशने सौरव नवलेला (12) बाद करून महाराष्ट्राची 3.2 षटकांत 5 बाद 18 अशी दाणादाण उडवली.
ऋतुराज, सक्सेनाची शतकी भागीदारी
महाराष्ट्राचा डाव संकटात असताना ऋतुराज गायकवाड व जलज सक्सेना ही अनुभवी जोडी संकटमोचक ठरली. या दोघांनी आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत सहाव्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी करीत महाराष्ट्राच्या संकटाच्या खोल दरीतून बाहेर काढले. ऋतुराजने 151 चेंडूंच्या झुंजार खेळीत 91 धावा करताना 11 चेंडू सीमापार पाठविले, तर सक्सेनाने 106 चेंडूंत 4 चौकारांसह 49 धावांची धिरोत्तर खेळी केली. मात्र ऋतुराजचे हुकलेले शतक अन् सक्सेनाचे अर्धशतकापासून वंचित राहणे चाहत्यांच्या मनाला चटका लावणारे ठरले. निधीशने सक्सेनाला, तर इडन ऍपल टॉपने ऋतुराजला बाद केले. केरळकडून एम. डी. निधीशने सर्वाधिक 4 बळी टिपले.