
रत्नागिरी शहरातील रस्त्यांची जी दयनीय अवस्था झाली आहे, त्याला जबाबदार पालकमंत्री उदय सामंत आहेत. पाच वेळा निवडून आलो असे सांगून विकासाचे स्वतःला धनी मानतात तसे पालकमंत्री म्हणून ते अपयशाचे धनी आहेत. खड्डेमय रस्त्यांच्या विरोधात आम्ही रास्तारोको केला, त्याचवेळी पालकमंत्री उदय सामंत हे मारूतीमंदिर येथून विमानतळाकडे गुर्मीत निघून गेले. लोक रस्त्यावर थांबली असताना ते थांबले नाहीत त्यांना सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज चढला असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते, माजी आमदार बाळ माने यांनी आज रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत केला.
माजी आमदार बाळ माने पुढे म्हणाले की, अलीकडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत रत्नागिरी शहराचा विकास होणार असल्याचे सांगितले. ती विकासकामे न्याती कंपनी करणार आहे. आता ही न्याती कंपनी आली कुठून हा इतिहास आम्ही जनतेसमोर लवकरच आणणार आहोत. पण यापूर्वी रत्नागिरी शहरातील रस्ते कोणत्या ठेकेदारांनी केले, त्याची एक श्वेतपत्रिका काढावी. रत्नागिरी शहरात टिकणारे रस्ते होणार आहेत की नाही? याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी बाळ माने यांनी केली. आम्ही जेव्हा रास्तारोको केला तेव्हा यांचे लाभार्थी पुढे आले. त्यांनी आमच्यावर टीका करताना शिरगावातील आम्ही केलेल्या रस्त्यावर खड्डे पडले अशी दिशाभूल केली. आमचं आंदोलन होईपर्यंत हे लाभार्थी होते कुठे? त्यांना खड्डे पडले हे माहित नव्हते का? असा सवाल उपस्थित करताना आमच्या नादाला लागू नका असा इशारा बाळ माने यांनी दिला. यावेळी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
फडणवीसांनी उद्योग खात्यात सल्लागार नेमला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंत यांच्या उद्योग खात्यात स्वतंत्र सल्लागार नेमल्याची माहिती मिळते. त्याच्याशिवाय फाईल पुढे जात नाही, हा आमच्या उद्योगमंत्र्यांचा अपमान आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना उद्योग खात्यात उदय सामंत यांनी उलटसुलट व्यवहार केल्याचाही आरोप बाळ माने यांनी केला.
धाकट्याची माणसं घ्यायची की मोठ्याची?
रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय आणल्याचे पालकमंत्री उदय सामंत सांगतात. आज त्या महाविद्यालयात प्राध्यापक नाहीत. विद्यार्थ्यांनी स्व-अध्ययन करून यश मिळवले आहे. तुम्ही प्राध्यापक वर्ग का भरू शकला नाहीत? चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी भरण्यासाठी एका कंपनीला काम दिले, मात्र धाकट्याची माणसं घ्यायची की मोठ्याची? हा प्रश्न त्या कंपनीसमोर पडला असल्याचे सांगून बाळ माने यांनी सामंत बंधूंवर टीका केली.
सुरतवरून गुवाहाटी फिरलात कुणाला कपटी म्हणता?
दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत आले तेव्हा विरोधक कपटी आहेत अशी टीका त्यांनी केली. तुम्ही कुणाला कपटी म्हणता? कुठे होतात तुम्ही? स्वर्गीय आनंद दिघे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तुम्हाला पुनर्जन्म दिला त्यांना तुम्ही कपटी म्हणता? गद्दारी करून सुरतवरून गुवाहाटीला गेलात मग सांगा कोण कपटी? असा सवाल बाळ माने यांनी एकनाथ शिंदे यांना विचारला.