1 नोव्हेंबरला मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा, निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात लढा

महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे पुराव्यानिशी समोर येऊनही मतदार याद्या निर्दोषच असल्याचा दावा आयोगाकडून होत आहे. आयोगाच्या या मनमानी, भ्रष्ट कारभाराविरोधात आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी 1 नोव्हेंबरला मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची घोषणा आज शिवसेना भवन येथे संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली.

दादर येथील शिवसेना भवनात आज सर्वपक्षीय विरोधी पक्षांची पत्रकार परिषद झाली. त्यात शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, काँग्रेस नेते सचिन सावंत, मनसे नेते बाळा नांदगावकर, कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी यांनी ही घोषणा केली. मनसेचे नेते नितीन सरदेसाई, अभिजित पानसे, राजू पाटील, मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे, अविनाश जाधव, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत यावेळी उपस्थित होते. आगामी निवडणुका पारदर्शक व्हाव्यात आणि लोकशाहीचा पाया भक्कम व्हावा यासाठी संपूर्ण ताकदीनिशी या मोर्चात सहभागी होऊ, असे सर्व नेत्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रातली शहरे आणि गावागावातील कार्यकर्ते आणि मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक या मोर्चात सहभागी होतील आणि मतदारांची ताकद देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि निवडणूक आयोगाला दाखवली जाईल, असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. दोन दिवस निवडणूक आयोगाबरोबर यासंदर्भात बैठका झाल्या. मात्र विरोधी पक्षांनी मांडलेल्या भूमिका मानायला आयोग तयार नाही. आयोग ऐकत नसेल तर त्यांना रस्त्यावर उतरून दणका द्यावाच लागेल असे विरोधकांचे एकमत झाले आहे, असे संजय राऊत म्हणाले.

आयोगाचे स्पष्टीकरण खोटे

निवडणूक आयोगाने मतदार यादीमधील घोळाबाबत केलेला खुलासा खोटा आहे असे सांगतानाच, निवडणूक घ्यायची असेल तर मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती झालीच पाहिजे, असे स्पष्ट मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी मांडले. मतदार आणि राजकीय पक्षांची ही तीव्र भावना दाखवण्यासाठीच हा मोर्चा असल्याचे ते म्हणाले.

अमित शहांनी घुसखोरांना बाहेर काढावे

महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये जवळपास एक कोटी बोगस मतदार आहेत. ते एकप्रकारे घुसखोर आहेत आणि त्या घुसखोरांना बाहेर काढणे ही लोकशाहीची गरज आहे. आम्ही घुसखोरांना शोधू आणि त्यांची नावे मतदार यादीतून बाहेर काढू असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिल्लीतील कार्यक्रमात म्हणाले होते. मग निवडणूक कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून त्यांनी महाराष्ट्रापासून ही मोहीम सुरू करावी, असे आवाहन यावेळी संजय राऊत यांनी केले.

हा लढा लोकशाही वाचवण्यासाठी

लोकशाहीला धक्का पोहोचवणाऱयांविरुद्ध हा मोर्चा असल्याने सत्तेत असणाऱयांनीही त्यात सहभागी व्हावे, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले. लोकशाही वाचली पाहिजे यासाठीच हा लढा असून 1 नोव्हेंबरच्या मोर्चात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले. लोकशाहीच्या रक्षणासाठी काढण्यात येणाऱया या मोर्चात काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी सहभागी होईल, असे काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले.

संयुक्त पत्रकार परिषद होणार

मोर्चाची वेळ आणि मार्ग लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मोर्चाचे नेतृत्व करणारे आमचे प्रमुख नेते पुन्हा एकदा एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती देतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.