
महिला वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यामध्ये स्पर्धेतील 21वा सामना खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने बांगलादेशला 203 धावांचे आव्हान दिले आहे. तत्पूर्वी श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापटूने मोठी कामगिरी केली असून एका नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तिने या सामन्यात फक्त 46 धावा केल्या आणि नव्या विक्रमावर आपलं नाव कोरलं आहे.
श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापटू आता श्रीलंकेकडून वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला खेळाडू ठरली आहे. बांगलादेशविरुद्ध तिने 46 धावा केल्या आणि 4000 धावांचा टप्पा पार केला. तसेच महिला वनडेमध्ये 4000 धावा करणारी ती जगातली 20वी खेळाडू ठरली आहे. चमारीने आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये 120 वनडे सामने खेळले आहेत. तिच्या नावावर 9 शतके आणि 20 अर्धशतकांचा समावेश असून तिने 35.17 च्या सरासरीने तिने 4045 धावा केल्या आहेत. तसेच 17 एप्रिल 2024 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिने सर्वाधिक 195 धावांची खेळी केली होती.