
मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या ‘मेट्रो-2बी’ प्रकल्पांतर्गत मंडाले (मानखुर्द) ते चेंबूर यादरम्यानचा पहिला टप्पा लवकरच खुला होणार आहे. या मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) मेट्रो रेल्वे सुरक्षा मंडळाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. ‘मेट्रो-3’पाठोपाठ मंडाले–चेंबूर मार्गावर मेट्रो धावणार असल्याने मुंबईकरांचा प्रवास आणखी सुलभ होणार आहे.
एकूण 23.6 किमी लांबीचा बहुप्रतीक्षित मेट्रो-2 प्रकल्प दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. त्यात सध्या प्रवासी सेवेत दाखल असलेली लाइन 2ए (दहिसर ते डीएन नगर) आणि लाइन 2बी (डीएन नगर ते मानखुर्द-मंडाले) यांचा समावेश आहे. यापैकी ‘मेट्रो-2बी’ अंतर्गत मंडाले ते चेंबूर मार्गावर मेट्रोची सेवा सुरू करण्यासाठी अनिवार्य सुरक्षा प्रमाणपत्र एमएमआरडीएला प्राप्त झाले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 5.6 किमी मार्गावर प्रवासी सेवा सुरू केली जाणार आहे. सध्या या मार्गिकेवरील स्थानकांची साफसफाई आणि रंगकामाला गती देण्यात आली आहे. एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी गेल्याच आठवडय़ात स्थानकांची पाहणी केली आणि अंतर्गत कामाचा आढावा घेतला. त्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत मंडाले ते चेंबूर मेट्रो धावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पहिल्या टप्प्यात पाच स्थानके
डीएन नगर ते मंडाले हा 23.6 किमी लांबीचा मार्ग आहे. संपूर्ण मार्गिकेचे काम पूर्ण झालेले नाही. 5.6 किमी लांबीच्या पहिल्या टप्प्यात मंडाले, मानखुर्द, बीएसएनएल, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि डायमंड ही केवळ पाच स्थानके प्रवासी सेवेत दाखल होणार आहेत.
अनेकवेळा ‘डेडलाइन’ चुकली!
10,986 कोटी रुपयांच्या मेट्रो मार्गिकेचे बांधकाम सुरू झाल्यापासून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. सुरुवातीला ऑक्टोबर 2022 पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन होते, परंतु कंत्राटदाराची अकार्यक्षमता, वीज ट्रान्समिशन लाइन्सचे स्थलांतर आणि इतर अडथळय़ांमुळे काम रखडले. गेल्या काही वर्षांत अनेकवेळा या प्रकल्पाची ‘डेडलाइन’ चुकली. या मेट्रो सेवेची पूर्व उपनगरातील नागरिकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे.