
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी नरक चतुर्दशीला ठाण्यात दीप उजळले आणि सरकारविरोधात विरोधकांचे ‘फटाके’ ही फुटले. निमित्त होते पाचपाखाडीतील तुळजाभवानी मंदिरात महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या दीपोत्सवाचे. या दीपोत्सवात शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र येत एकीचे दीप प्रज्वलीत केले आणि जनतेवर अन्याय करणाऱ्या नरकासुराला येत्या निवडणुकीत चिरडण्याचा निर्धारही केला.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नव्या तुळजाभवानी मंदिरात आज सायंकाळी दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आव्हाड यांच्यासह शिवसेना नेते-माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, मनसेचे नेते अविनाश जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकजुटीचा दीपोत्सव साजरा करतानाच या राज्यावर अन्यायाचा वरवंटा फिरवणाऱ्या नरकासुराचा नायनाट करण्याचा निर्धार केला.
एकीकडे दिवाळी साजरी होत असतानाच मराठवाड्यातील बळीराजा संकटात आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, पण सरकार कुठे आहे?
– राजन विचारे (शिवसेना नेते, माजी खासदार)
सत्ताधाऱ्यांची दादागिरी आणि दडपशाही आता जास्त काळ चालणार नाही. तुम्ही कितीही झोल झाल केला तरी तो – चव्हाट्यावर आणू.
– अविनाश जाधव (मनसे नेते)
सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही भक्कम एकजूट केली आहे. निवडणूक याद्यांमधील घोळ, वोटचोरीविरोधात फटाके फोडणारच.
– जितेंद्र आव्हाड, (आमदार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)
पालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवणार. सरकारविरोधात लढणार.
– विक्रांत चव्हाण (काँग्रेस जिल्हाध्यक्ष )