उल्हासनगरातील पाणीगळतीला चाप; महापालिकेने नेमले दोन कंत्राटदार

अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा तसेच पाणीगळतीमुळे उल्हासनगरमधील रहिवासी हैराण झाले आहेत. त्यात फुटलेल्या पाइपलाइनमधून पाण्याची गळती होऊन हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. या पाणीगळतीला चाप बसवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी दोन कंत्राटदारांची नेमणूक केली असून शहरातील पाइपलाइन दुरुस्तीच्या कामासाठी ८४ लाखांची तरतूददेखील केली आहे. त्यामुळे शहरामधील विविध विभागातील पाणीगळती थांबणार असून नागरिकांना सुरळीत व स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणार आहे.

अवघ्या १३ किलोमीटर क्षेत्रफळात वसलेल्या उल्हासनगरला एमआयडीसी विभागाकडून प्रतिदिन १४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. मात्र शहरातील सुरू असलेली विकासकामे व खोदकामामुळे भूमिगत जलवाहिन्या फुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या फुटलेल्या आणि गळक्या पाइपलाइनमुळे अनेक भागात पाणीपुरवठा होत नाही, तर काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शहरातील फुटलेल्या आणि गळक्या पाइपलाइन दुरुस्त करण्यासाठी नागरिकांनी पालिका मुख्यालयावर धडक देत अनेक आंदोलने व उपोषणेदेखील केली. दरम्यान पाणीगळतीची समस्या गंभीर असल्याचे लक्षात येताच महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी या पाइपलाइनची तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला दिल्या.

दोन्ही डिव्हिजनसाठी स्वतंत्र ठेकेदार
शहरात बहुतांश कामे अंतिम टप्प्यात असून पाइपलाइन गळती झाल्यास त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी पूर्व आणि पश्चिम या दोन्ही डिव्हिजनसाठी स्वतंत्र ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली आहे. पाणीगळतीमुळे शहरात पाणीटंचाई उद्भवणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश आयुक्त आव्हाळे यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्याचे उपायुक्त अनंत जवादवार यांनी सांगितले.