परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे दिवाळे; मोखाड्यात कापणीला आलेले पीक शेतातच आडवे

एकीकडे दिवाळीचा लखलखाट सुरू असतानाच दुसरीकडे मोखाडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अक्षरशः दिवाळे निघाले आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने कापणीला आलेले पीक शेतातच आडवे झाल्याने बळीराजाचे अतोनात नुकसान झाले आहे. ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून सण साजरा तरी कसा करणार, असा प्रश्न त्यांच्या कुटुंबाला पडला आहे.

खरीप हंगामात झालेल्या मुसळधार पावसाने मोखाड्याच्या ४९ गावातील १८६ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे १ हजार ४४१ शेतकरी बाधित झाले सरकारची तुटपुंजी मदत शासनाने कोरडवाहू जमिनीला हेक्टरी १८ हजार ५००, हंगामी बागायतदार क्षेत्र २७ हजार तर बागायती शेतीला ३२ हजार ५०० रुपये अशी तीन क्षेत्रात विभागून मदतीला मंजुरी दिली आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जमिनी कोरडवाहू क्षेत्रात मोडत असल्याने त्यांना हेक्टरी १८ हजार ५०० रुपये एवढीच तुटपुंजी मदत मिळणार आहे.

परतीचा पाऊस पुन्हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याने हाताशी आलेले उर्वरित पीकही वाया जाणार आहे. शेतकऱ्यांच्या हाती केवळ पेंढाच लागणार आहे. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.