
पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच 2010 साली आलेल्या ‘नटरंग’ या चित्रपटाने त्या काळात अमाप लोकप्रियता मिळवत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं रवी जाधव यांनी तर झी टॉकीजची ही पहिलीच निर्मिती होती. मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास घडविणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती करणारे झी स्टुडिओज, अथांश कम्युनिकेशन आणि दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा एकदा एकत्र आले आहेत एक नवा कोरा तमाशापट घेऊन ज्याचं नाव आहे ‘फुलवरा’. दिवाळी सणाच्या शुभमुहूर्तावर समाजमाध्यमावरून या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून घोषणेपासूनच या चित्रपटाबद्दल कमालीचं उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ‘फुलवरा’ चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन रवी जाधव यांचे असून कथा-पटकथा-संवाद आणि गीते ईश्वर ताराबाई अंधारे यांचे आहेत. संगीत हर्ष-विजय यांचं असून निर्मिती उमेशकुमार बन्सल, बवेश जानवलेकर (झी स्टु़डिओज) आणि मेघना जाधव (अथांश कम्युनिकेशन) यांची आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत कोणते कलाकार असतील हे अद्याप गुलदस्त्यात असून याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. पुढच्या वर्षीच्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.